BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ‘शास्तीकर ‘पाप’ असेल तर तो सोडविण्याची जबाबदारी भाजपचीच’

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची उपरोधिक टीका

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – आमदार लक्ष्मण जगताप पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे संलग्न आमदार होते. त्यांच्या कार्यकाळातच विधीमंडळात शास्तीकर लागू करण्याचे विधेयक पारित झाले. तेच जगताप आता भाजपचे शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे शास्तीकर पाप असल्यास आता जगताप तुमच्याकडे आल्याने शास्तीकराचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी भाजपचीच आहे, अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. तसेच आगामी निवडणुकीत शहरातील जनता भाजपाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि. 9 जानेवारी) रोजी पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू, असे आश्वासन दिल्यानंतर विरोधकांनी शनिवार (दि.12) पासून मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे ‘काऊंट डाऊन’ सुरु केले होते. त्यावर ‘शास्तीकर हे विरोधकांचेच पाप असून ते धुण्याचे काम आम्ही करत आहोत’, अशी टीका सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केली होती. त्याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज (बुधवारी) प्रत्युत्तर दिले.

पत्रकारांशी बोलताना साने म्हणाले, ”शास्तीकराचे विधेयक विधीमंडळात पारित होत असताना आज भाजपचे शहराध्यक्ष असलेले लक्ष्मण जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे संलग्न आमदार होते. त्यांच्या कार्यकाळातच विधीमंडळात शास्तीकर लागू करण्याचे विधेयक पारित झाले. त्यामुळे शास्तीकर पाप असल्यास आता जगताप भाजपमध्ये असल्याने शास्तीकराचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी भाजपवरच आहे. मागील लोकलसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी अवैध बांधकामाचा शास्तीकर 100 टक्के माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शहरवासियांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. परंतु, चार वर्षात भाजपने शास्तीकर माफ झाल्याचे खोटे सांगून जनतेची घोर फसवणूक केली आहे”.

”शहरात आल्यानंतर तीनही वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शास्तीकर माफ झाल्याची घोषणा केली. त्यानंतर दोन्ही आमदारांनी प्रश्न सुटल्याचे सांगत शहरभर फलक लावले, पेढे वाटले. त्यानंतर पुन्हा आम्हाला शास्तीची धास्ती असल्याचे आमदार मुख्यमंत्र्यासमोर सांगतात, हे शहराचे दुर्भाग्य आहे. तसेच प्रश्न सुटल्याचे सांगत फलक लावून जनतेची दिशाभूल कशासाठी केली”? असा सवाल साने यांनी उपस्थित केला.

… जनता उपाशी अन आमदार तुपाशी
”600 स्केवअर फुटपर्यंतच्या मालमत्तांचा शास्तीकर माफीचा आमदारांच्या बगलबच्यांना लाभ झाला आहे. आमची पुर्वीपासून 100 टक्के शास्तीकर माफ करण्याची मागणी आहे. 100 टक्के शास्तीकर माफी करण्याची भाजपची जबाबदारी आहे. जोपर्यंत सरसकट शास्तीकर माफ होत नाही. तोपर्यंत भाजपला झोपू देणार नाही, असा इशाराही साने यांनी दिला. आगामी निवडणुकांमध्ये शहरातील जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. महापालिका लुटण्याचे काम सुरु आहे. शहरातील जनता उपाशी आणि आमदार, पदाधिकारी त्यांचे बगलबच्चे तुपाशी आहेत”, असा आरोपही साने यांनी केला.

… तोपर्यंत कोणीही शास्तीकर भरु नये !
मालमत्ताधाराकांना जप्तीच्या नोटीसा दिल्या जात आहेत. महापालिकेने या नोटीसा देणे त्वरित थांबवावे. नागरिकांनी 100 टक्के शास्तीकर माफ होत नाही, तोपर्यंत शास्तीकर भरु नये, असे आवाहनही साने यांनी केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे काऊंटन संपल्यानंतर सर्व विरोधक, विविध सामाजिक संघटना मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A4

.