Pimpri : शहराचा 50 वर्षाचा इतिहास उलगडणार ग्रंथातून

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला येत्या 4 मार्च रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने शहराच्या माहितीचा आठशे पानांचा ग्रंथ छापण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 10 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये शहराचा आजपर्यंतचा विकास, विविध प्रकल्प, शहराचे धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव, कला, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी या ग्रंथामध्ये गुंफली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची निर्मिती खेड्यापासून झाली आहे. महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. शहराने पन्नास वर्षात खूप प्रगती केली आहे. शहराच्या स्थापनेला 4 मार्च रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शहराचा आजपर्यंतचा सोनेरी प्रवास ग्रंथात मांडला जाणार आहे. शहराची झालेली जडणघडण, प्रवास, विविध प्रकल्प, याची माहिती दिली जाणार आहे. पन्नास वर्षांतील राजकीय वाटचाल, खेडेगाव ते स्मार्टसिटी असा संपूर्ण प्रवास या ग्रंथात मांडला जाणार आहे.

या ग्रंथामुळे शहराच्या वाटचालीची, विकासकामांची सर्वांगीण माहिती शब्दबद्ध होणार आहे. येणाऱ्या पिढीसाठी हा मोठा ऐतिहासिक दस्तऐवज ठरणार आहे. पुणे शहरांनेही शहराचा गौरवशाली इतिहास संपादित केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा आजपर्यंत कोणताही स्वरुपाचा दस्ताऐवज उपलब्ध नाही. तसेच महापालिकेकडेही त्याची टिप्पणी नाही. या ग्रंथाद्वारे शहाराचा मागील पन्नास वर्षांचा कार्यकाळ समोर येणार आहे.

या ग्रंथाची निर्मिती अंशुल प्रकाशनच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे यासाठी सुसज्ज अशी टीम आहे. माहिती संकलनासाठी व लेखनासाठी त्यांच्याकडे दहा माणसांचे पथक तयार आहे. आठशे पानांच्या या ग्रंथासाठी दुर्मिळ छायाचित्रांचा शोध घेणे, मांडणी करणे, तज्ज्ञाच्या मुलाखती, लेखन व छपाई केली जाणार आहे. यासाठी दहा लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्याठीच्या येणाऱ्या खर्चाला मान्यता घेण्यासाठी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.