Pimpri: आता YCM रुग्णालयातील डॉक्टरांची सुरक्षा करणार ‘बाऊंसर’

एका पाळीत 1 महिला आणि 3 पुरुष असे तीन पाळीत एकूण 12 'बाऊंसर' रुग्णालयाच्या आवारात तैनात असणार आहेत. : Bouncer to protect YCM hospital doctors now

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डॉक्टर, नर्सच्या सुरक्षिततेसाठी आता ‘बाऊंसर’ तैनात असणार आहेत. एका पाळीत 1 महिला आणि 3 पुरुष असे तीन पाळीत एकूण 12 ‘बाऊंसर’ रुग्णालयाच्या आवारात तैनात असणार आहेत.

एका ‘बाऊंसर’ला प्रतिमहिना 25 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यानुसार 4 महिला व 8 पुरुष ‘बाऊंसर’ यांना दोन महिन्यासाठी 6 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.5) होणा-या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

महापालिकेचे संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित घोषित केले आहे. कोरोना बाधित रुग्णांवर या रुग्णालयात उपचार केले जातात.

शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत.

25 आणि 27 जुलै 2020 रोजी डॉक्टर, स्टाफनर्स इतर कर्मचा-यांना शिवीगाळ व दमदाटीचे प्रकार घडले होते.

यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याने वैद्यकीय कर्मचा-यांचे मनोबल कमी होत असून सेवा देण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या वायसीएममधील डॉक्टरांसह कर्मचा-यांनी 27 जुलै रोजी कामबंद आंदोलनही केले होते.

सद्यस्थितीमध्ये शहरातील कोरोना विषाणूची परिस्थिती पाहता पुढील दोन महिने बाधित रुग्णांची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे पुढील दोन महिने वैद्यकीय कर्मचा-यांना वाढीव सुरक्षा देण्याबाबत 27 जुलै रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर,  अतिरिक्त अजित पवार, प्रवीण तुपे यांच्यात चर्चा झाली होती. त्यानुसार वायसीएममध्ये तातडीची बाब म्हणून तात्पुरत्या स्वरुपात  ‘बाऊंसर’ घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.

‘प्रोटेक्शन पॉवर बाऊंसर’ या संस्थेने अतिरिक्त आयुक्त पवार यांना कोटेशन सादर केले.  अतिरिक्त आयुक्तांनी या संस्थेकडून 1 महिला व 3 पुरुष ‘बाऊंसर’ असे तीन पाळीत एकूण 12 ‘बाऊंसर’ पुढील दोन महिन्यासाठी घेण्याचे आदेश सुरक्षा अधिका-यांना दिले होते.

ही बाब तातडीची आहे. त्यामुळे निविदा प्रणाली राबविली जाणार नाही. आयुक्तांची प्रशासकीय मान्यता घेऊन स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला आहे.

संस्थेच्या कोटेशननुसार एका ‘बाऊंसर’ला प्रतिमहा 25 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यानुसार 4 महिला व 8 पुरुष ‘बाऊंसर’ यांचा दोन महिन्यासाठी 6 लाख रुपये खर्च येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.