Pimpri: शहरात ‘कोरोना’ला ब्रेक; सात दिवसांपासून एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही

1342 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये; पावणे पाच लाख नागरिकांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील सात दिवसांपासून कोरोनाचा एकही नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. त्याउलट तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन ठणठणीत झाले आहेत. त्यामुळे आनंद व्यक्त केला जात असून, दक्षता घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो, असा विश्वास शहरवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. तर, परदेशातून आलेले एक हजार 342 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरातील 4 लाख 78 हजार 726 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 183 व्यक्तींचे घशातील द्रावांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आज अखेर 157 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटीव्ह 12 रुग्णांपैकी ज्यांचे 14 दिवसांचा कालावधी पुर्ण झालेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील 3 रुग्णांचे 24 तासातील घशातील द्रावाचे लागोपाठ दोन नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना 14 दिवस घरातील विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 9 झाली आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयामधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

आज (शुक्रवारी) 13 व्यक्तींना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कोरोना करीता घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या 244 कर्मचा-यांच्या पथकाने आजअखेर शहरातील 4 लाख 78 हजार 726 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.