Pimpri नवोदित दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी मोठ्या संख्येने मनोरंजनाच्या क्षेत्रात पुढे यायला हवे – राही बर्वे

एमपीसी न्यूज – नवोदित दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी मोठ्या संख्येने मनोरंजनाच्या क्षेत्रात पुढे यायला हवे. त्यांनी आजूबाजूला आयोजित करण्यात येणा-या वेगवेगळ्या फेस्टिव्हलना अवश्य हजेरी लावली पाहिजे. मी देखील अशा विविध फेस्टिव्हलना आवर्जून जात असे, असे मत तुंबाड या सुप्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने 16 व 17 मार्चला प्रथमच पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे (शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल) आयोजन करण्यात आले असून जगातील वेगवेगळ्या 50 देशांतून आलेल्या 246 लघुचित्रपटांपैकी परीक्षकांनी निवडलेले 41 लघुचित्रपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राही बर्वे यांच्या हस्ते शनिवारी(१६ मार्च) चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.

  • यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेजच्या संचालिका कोमल साळुंखे, महाराष्ट्र राज्य चित्रपट मंडळाच्या सदस्या तेजस्विनी कदम, बाळासाहेब गायकवाड, संयोजक व पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबचे प्रमुख अविनाश कांबीकर व दत्ता गुंड उपस्थित होते.

यावेळी भाऊसाहेब भोईर, अनुराधा गोरखे, कोमल साळुंखे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. या महोत्सवामागील संकल्पना अविनाश कांबीकर यांनी स्पष्ट केली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे यांनी देखील या महोत्सवाला हजेरी लावली. तसेच तरुण कलाकार, तंत्रज्ञ, रसिकांची बहुसंख्येने या महोत्सवाला उपस्थिती होती.

  • यावेळी महोत्सवाची सुरुवात ‘द रियल हिरोज’ या लघुपटाने झाली. हा लघुपट पिंपरी-चिंचवडमधील स्वच्छ सफाई कामगारांवर आधारित आहे. त्यानंतर देशातील आणि परदेशातील लघुपट दाखवण्यात आले. या महोत्सवात दि. 16 मार्चला सिनेप्रेमींसाठी वर्ल्ड सिनेमा या माध्यमांतून आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट सिनेप्रेमींना बघण्यास मिळाले.

या फेस्टिव्हल दरम्यान महिलांसाठी खास वेगळे सेशन घेण्यात येणार आहे. महिलांच्या विविध विषयाला गवसणी घालणारे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आणि रोमानिया येथे निवड झालेला दिग्दर्शक रमेश होलबोले यांचा आगासवाडी (विलेज इन द स्काय) हा विशेष माहितीपट दाखविण्यात येणार आहे.

  • यावेळी पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्यावतीने देण्यात येणारा पहिला युवा प्रेरणा पुरस्कार 2019साठी राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण यांना देण्यात येणार आहे. अविनाश अरुण हे पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी असून या क्षेत्रातील काम करणा-या व्यक्तींसाठी ते प्रेरणादायी तरुण व्यक्तिमत्व आहे. पारितोषिक वितरण तुंबाड या बहुचर्चित हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुप्रिम मोशन पिक्चरचे संचालक राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक सुजय डहाके, राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.

चित्रपटाशी संबंधित पोस्टर प्रदर्शन देखील भरविण्यात आले असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे (शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल) आयोजन करण्यात आले. यावेळी (डावीकडून) राही बर्वे, भाऊसाहेब भोईर ,अनुराधा गोरखे, तेजस्विनी कदम कोमल साळुंखे, बाळासाहेब गायकवाड, अविनाश कामबीकर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.