Pimpri: महापालिकेच्या निगडीतील व्यायामशाळेची इमारत गुन्हे शाखा कार्यालयासाठी भाड्याने देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत गुन्हे शाखेचे कार्यालय शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या निगडी-यमुनानगर येथील अहिल्यादेवी होळकर व्यायामशाळेची इमारत गुन्हे शाखा युनिट दोनसाठी भाड्याने देण्यात येणार आहे. त्यामुळे आयुक्तालय, मुख्यालयाबरोबरच गुन्हे शाखेसाठीही पोलीसांना महापालिकेचीच मालमत्ता मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार 15 ऑगस्ट 2018 पासून चिंचवड येथील ऑटो क्लस्टर इमारतीतून तात्पुरत्या स्वरूपात सुरू झाला. चिंचवड -प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी निश्चित करण्यात आली. मात्र, फर्निचरसह इतर सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तब्बल साडेचार महिन्यांचा कालावधी गेला. अखेर 1 जानेवारी 2019 पासून प्रेमलोक पार्क येथील नवीन इमारतीतून पोलीस आयुक्तालयाचा कारभार सुरू झाला.

पोलीस आयुक्तालयाच्या दोन मजल्याच्या इमारतीत आयुक्त, उपायुक्त गुन्हे, विशेष विभाग, सहायक आयुक्त गुन्हे, सहायक आयुक्त प्रशासन यांचे कक्ष पहिल्या मजल्यावर आहेत. तसेच नियंत्रण कक्ष, बिनतारी संदेश यंत्रणा याच मजल्यावर आहेत. आयुक्त दालनालगतच मिटींग रूम आणि अँटी चेंबर आहे. तळ मजल्यावर स्वागत कक्ष, विशेष शाखा अधिकारी, परदेशी नागरिक नोंदणी विभाग आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय महापालिकेच्याच निगडी – प्राधिकरणातील सेक्टर 24 मध्ये कै. अंकुशराव बो-हाडे विद्यालय इमारतीत आहे. मुख्यालयाच्या आवारात प्रशस्त मैदान आहे. या मैदानात पोलीसांची नियमतिपणे परेडही होते. चिंचवड आरक्षण क्रमांक 211 मधील व्यापारी केंद्रातही पोलीस आयुक्तालयाच्या इतर विभागांची कामे होणार आहेत. पिंपरी, चिंचवड, निगडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रासाठी गुन्हे शाखा युनिट दोनचे कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने या कार्यालयासाठी महापालिकेच्या निगडी – यमुनानगर येथील अहिल्यादेवी होळकर व्यायामशाळेची इमारत भाडेतत्वावर देण्यात यावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांनी 20 ऑगस्ट 2019 रोजी महापालिका प्रशासनाकडे केली होती. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 91.64 चौरस मीटर आहे. तर, तळमजला 986.41 चौरस फुट आहे. पोलीसांना कायदा-सुव्यवस्था राखणे सोयीचे होण्याच्या दृष्टीने ही इमारत पाच वर्षासाठी भाड्याने देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.