Pimpri : तीन दुकाने फोडून आठ लाख रुपयांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – बंद दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातून आठ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 4) सकाळी दहाच्या सुमारास साई चौक पिंपरी येथे उघडकीस आली.

जोईताराम केसाराम चौधरी (वय 35, रा. आनंदनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांची साई मार्केट मधील जय प्लाझा बेसमेंट येथे तीन दुकाने आहेत. सोमवारी रात्री त्यांनी दुकाने कुलूप लावून बंद केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून ग्रीलचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून आठ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास दुकान उघडण्याच्या वेळी हा प्रकार समोर आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.