Pimpri: हिंजवडी आणि चिखलीतील मोबाईल शॉपी फोडली, भोसरीत गिफ्ट शॉप फोडले

11 लाख 87 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – हिंजवडी आणि चिखलीतील मोबाईल शॉपी तर भोसरीतील गारमेंन्टस, गिफ्ट शॉप, पुणेरी बेकर्सचे दुकाने चोरट्याने फोडले आहे. या तिनही घटनेत तब्बल 11 लाख 87 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

हिंजवडी येथील घटनेप्रकरणी कमलेश भजनदास लेखवाणी (वय 31, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. लेखवाणी यांची हिंजवडीतील शिवाजी चौकात ‘द हिमालया’ या नावाने मोबाईल शॉपी आहे. गुरुवारी मध्यरात्री चोरटे दुकानाचा मागचा पत्रा व प्लाउड उचकटून आतमध्ये घुसले. दुकानातील 8 लाख 69 हजार रुपयांचे वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि 90 हजार रुपयांची रोकड लंपास केली. लेखवाणी यांनी शुक्रवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी ठाण्याचे फौजदार एन.आर.आंगज तपास करत आहेत.

चिखली, कुदळवाडी येथील मेनरोडवरील ‘छाया मोबाईल शॉपी’च्या छताचा पत्रा व पीयुपी उचकटून चोरटे आतमध्ये घुसले. दुकानातील 54 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन, मेमरी कार्ड, पॉवर बँक आणि पाच हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बालाजी मदन येवते (वय 35, तुकारामनगर, तळवडे)यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखली ठाण्याचे फौजदार चपाईतकर तपास करत आहेत.

भोसरीतील घटनेप्रकरणी सुजाराम जयवंतारामा देवासी (वय 39, रा. लांडगेनगर, भोसरी)यांनी फिर्याद दिली आहे. देवासी यांचे इंद्रायणीनगर येथील लेमन गारमेन्टसचे, दादासाहेब भाऊराव फुके यांचे पुणेरी बेकर्स आणि सुरेशकुमार मांगेलालजी चौधरी यांचे ‘गिफ्ट’ चे दुकान चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री फोडले. तीनही दुकानातील एक लाख 69 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.