Pimpri: सहा दिवसांच्या बंदनंतर पिंपरी कॅम्प पुन्हा सुरु

Pimpri camp resumes after six days of closure नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने आजपर्यंत चारवेळा कॅम्प बंद करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने सहा दिवस बंद ठेवल्यानंतर आज (सोमवारी) पिंपरी कॅम्प पुन्हा सुरु झाला आहे. पी-1, पी -2 (सम-विषम तारखांनुसार) दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांनी दिली.

सहा दिवसांनी कॅम्प सुरु झाल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान, दुकानदार, नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने आजपर्यंत चारवेळा कॅम्प बंद करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कॅम्प मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर 22 मार्च रोजी अटी-शर्तीसह बाजारपेठ सुरु केली होती. परंतु, बाजारपेठीतील दुकाने, ग्राहक यांच्याकडून अटी-शर्तीचे उल्लंघन केले जावू लागले.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नव्हते. फेस मास्कचा वापर केला नाही. सम-विषम तारखेच्या नियमाचे उल्लंघन होवू लागले. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 27 ते 31 मे पर्यंत बाजारपेठ बंद ठेवली होती.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे, गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास महापालिका आयुक्तांनी पुन्हा परवानगी दिली. मात्र, त्यानंतरही कोणीही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

दुकाने, ग्राहक यांच्याकडून अटी-शर्तीचे उल्लंघन केले जात होते. साई चौक, बौद्ध नगर, भाटनगर, रमाबाई नगर, आंबेडकर नगर, नानेकर चाळ, वैष्णव देवी मंदिर परिसर आदी भागात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले होते.

त्यामुळे पुन्हा तिस-यावेळी 23 ते 25 जून आणि चौथ्यावेळी 25 ते 28 जून अशी सहा दिवसांसाठी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

आजपासून पुन्हा बाजारपेठ सुरु झाली आहे. पी-1, पी -2 (सम-विषम तारखांनुसार) दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकानदार, नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन क्षेत्रीय अधिकारी झगडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.