Pimpri : शिवसेनेच्या वाट्याला विषय समितीचे सभापतीपद तरी येईल का ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने मित्र पक्ष शिवसेनेला सहभागी करुन घेतले नाही. एकाही प्रभाग समितीचे अध्यक्षपद दिले नाही. त्यानंतर आता पुढील महिन्यात होणा-या विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत तरी शिवसेनेला सत्ताधारी भाजप सत्तेत सहभागी करुन घेणार की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एखाद्या विषय समितीचे सभापतीपद मिळावे, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपची युती झाली. ही युती विधानसभा निवडणुकीसाठी देखील आहे. युती होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेत सहभागी करुन घेण्याची मागणी शिवसेनेने केली. याबाबत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पत्र दिले. स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप उमेदवाराला मतदान करत युती धर्माचे पालन केले होते. प्रभाग समितीच्या निवडणुकीत सत्ताधा-यांकडून शिवसेनेला सहभागी करुन घेतले जाईल असे अपेक्षित होते. परंतु, सत्ताधा-यांनी शिवसेनेला ‘ठेंगा’ दिला. तरी देखील मुख्य विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल न करता बिनविरोध निवडणूक होऊन दिली.

शिवसेनेला विषय समितीचे सभापतीपद मिळण्याची आशा आहे. विषय समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. 20 मे रोजी होणा-या सर्वसाधारण सभेत समितीचे सदस्य निवडले जाणार आहेत. त्यानंतर होणा-या सभापती निवडणुकीत एखाद्या समितीचे सभापतीपद मिळावे, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. विषय समिती सभापती निवडणुकीत तरी भाजप शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेणार का हे पहावे लागणार आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक पाचही मुख्य पक्षांनी स्वतंत्र लढविली होती. भाजपने विरोधकांना नामोहरम करत महापालिकेवर कमळ फुलविले होते. त्यानंतर महापालिकेच्या कारभारात मुख्य विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षाच्या नगरसेवकांनी वेळोवेळी सत्ताधा-यांच्या विरोधात एकत्रित आवाज उठविला होता.

याबाबत बोलताना शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर म्हणाले, ”महापालिकेतील सत्तेत शिवसेनेला सहभागी करुन घेण्याबाबत भाजपशी चर्चा केली जाईल. शिवसेना संपर्कप्रमुख बाळाभाई कदम हे पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी चर्चा करणार आहेत. प्रभाग समितीच्या निवडणुकीदरम्यान सर्व पदाधिकारी निवडणुकीत व्यस्त होते. त्यामुळे सत्तेतील सहभागाबाबत चर्चा झाली नाही. आता विषय समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याबाबत भाजपकडून निश्चित विचार केला जाईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.