रविवार, जानेवारी 29, 2023

Pimpri : दिव्यांग कल्याण योजना सल्लागारांची मुदतवाढ रद्द करा -मानव कांबळे

एमपीसी न्यूज – ‘दिव्यांग कल्याण योजनांसाठी’ नियुक्त करण्यात आलेले सल्लागार समीर घोष यांना मुदतवाढ देण्याचा व त्यासाठी एका वर्षासाठी सुमारे 39 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या सल्लागारांची मुदतवाढ रद्द करावी अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

या प्रस्तावास महापालिकेच्या ‘अपंग कल्याण समिती’च्या बहुतांश सदस्यांनी, अपंग संघटनांनी व नागरी हक्क सुरक्षा समितीने यापूर्वी विरोध केला होता. तरीही हा प्रस्ताव मंजूर करून घेणे व आर्थिक तरतूद करणे हे निंदनीय असल्याचे मत मानव कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

मानव कांबळे म्हणाले, मागील आर्थिक वर्षात कुठलेही योगदान नसताना या सल्लागारांना सुमारे 22 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. वर्षभरात दोन-चार बैठका घेणे आणि ‘थातूर मातुर’ चर्चा करणे एवढ्या कामाचा इतका मोबदला देणे ही सरळ सरळ महापालिकेच्या अपंग कल्याण विषयक निधीची लुट आहे, एवढेच नाव्हे तर करदात्या नागरिकांच्या पैशांवर टाकलेला हा ‘दरोडा’ आहे.

शहरामध्ये अपंगांच्या शिक्षण व पुनर्वसन क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते आणि संस्थाचालक उपलब्ध आसताना त्यांच्या अनुभवांचा व मार्गदर्शनाचा अव्हेर करून ज्यांचा शहराशी काही संबंध नाही आणि ज्यांचे या क्षेत्रात प्रत्यक्ष काहीही काम नाही अशा व्यक्तीला ‘सल्लागार’ नेमणे व त्यांच्यावर 40 लाख रुपयांची ‘उधळपट्टी’ करणे यामागचे काय ‘गौडबंगाल’ आहे याचा खुलासा होणे आवश्यक असल्याचे कांबळे म्हणाले.

सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे, अशात प्रशासकीय सोयीसाठी ‘अत्यावश्यक कामांनाच मंजुरी द्यावी’ असे पालकमंत्र्यांचे निर्देश असताना ‘सदर’ प्रस्ताव घाईघाईने मंजूर करण्याची काय आवश्यकता होती? असा सवाल कांबळे यांनी उपस्थित केला आहे. हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा, अन्यथा शहरातील अपंग संघटना व नागरी हक्क सुरक्षा समिती या विरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा मानव कांबळे यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

Latest news
Related news