Pimpri: यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते साफ सफाईची निविदा रद्द करा – मयूर कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते साफ सफाईच्या   निविदेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे ही निविदा तत्काळ रद्द करावी,  अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक, स्थायी समिती सदस्य मयूर कलाटे यांनी केली आहे.

याबाबत कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन  दिले आहे. त्यात  म्हटले आहे की,  शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफ सफाई करणे या कामांच्या निविदा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, सदर निविदा प्रक्रियेतील स्पर्धा टाळण्यासाठी निविदा धारकांकडून प्रयत्न केला जात असल्याचे कळते आहे.

एकमेकांच्या संगनमताने अधिकच्या खर्चाचे निविदा प्रस्ताव मनपाकडे सुपूर्द केल्याची माहिती हाती येत आहे. याशिवाय सर्व निविदा धारक रिंग करून प्रत्येक निविदा धारकास एक प्रभाग या प्रमाणे दर भरणार असल्याचे समजते.

त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. सध्या कोरोनाचे संकट पूर्ण राज्यावर असल्याने शासनाने 33 टक्के अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच नव्याने निविदा प्रक्रीया न करण्याबाबत आदेश दिले गेल आहेत. तरीही सदरच्या निविदा अत्यावश्यक आणि कोरोना निर्मलूना संदर्भात असल्याचे भासवून निविदा प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 14 मार्च पासून 17 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.  संचारबंदी अजून वाढण्याची शक्यता आहे.

या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे  बंद आहेत. त्यामुळे राज्याची तसेच महापालिकेची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे हि  निविदा प्रक्रीया राबविल्यास महापालिका आर्थिकदृष्टा अजून अडचणीत येईल. महापालिकेस अत्यावश्यक सुविधा पुरविताना अडचणी येऊ शकतात.

त्यामुळे सदरची निविदा रद्द होणे अत्यावश्य आहे.   या निविदेनुसार काम करण्यात आले. तर, यापूर्वी हेच काम शहरातील बेरोजगार तरुण, स्वंयरोजगार संस्थेच्या माध्यमातून करीत होते. शहरातील तरुण सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून गेली 15 वर्षांपासून तरुण हे काम स्वंयरोजगार संस्था स्थापन करुन प्रामाणिकपणे करत होते. त्यांचाही रोजगार जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच  उद्योगधंदे बंद आहेत त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. त्यात यांची सुध्दा भर पडेल. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आर्थिक परीस्थिती नाजूक असताना ही निविदा राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यात यावी. तसेच सध्या साफसफाई करणा-या संस्थांनाच मुदतवाढ देण्यात यावी, म्हणजे स्वच्छतेचे काम अडणार नाही,  असेही कलाटे यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.