Pimpri : अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती रद्द करून पालिकेच्या सक्षम अधिकाऱ्याची पदोन्नतीने नियुक्ती करा

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेत तिसरे अतिरिक्त आयुक्त म्हणून शासनाने साहेबराव गायकवाड यांनी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती रद्द करून नियमानुसार तिस-या अतिरिक्त आयुक्त पदावर पालिकेतील एका सक्षम अधिका-याला बढती देऊन नियुक्त करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

कर्मचारी महासंघाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 18 फेब्रुवारी रोजी महापालिका सेवा प्रवेश नियम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्तांची एकूण तीन पदे असून त्यातील एक पद महापालिका अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्या पदावर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त, उप आयुक्त अथवा समकक्ष पदावरील किमान 10 वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले जाणार असल्याचे म्हटले आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी दोन पदे ठेवण्यात आली आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शासनाच्या अधिकाऱ्यांच्या त्या दोन्ही पदांवर शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर 30 एप्रिल रोजी शासनाकडून साहेबराव गायकवाड यांची तिसऱ्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही बाब स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याचा पालिकेच्या कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असलेल्या एकमेव जागेवर शासन नियुक्त अधिकाऱ्यास रुजू करून न घेता पालिकेच्या आस्थापनेवरील सक्षम अधिकाऱ्याला पदोन्नती देऊन त्यांची अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करावी, अशी मागणी महासंघाकडून करण्यात आली असल्याचे महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगितले. तसेच आयुक्तांच्या कारवाईनंतर पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचेही चिंचवडे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.