Pimpri: उमेदवारांनो, प्लॅस्टिकचा वापर टाळा, अन्यथा होणार कारवाई; निवडणूक आयोगाचे आवाहन

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांनी प्लॅस्टिक बंदी पाळावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या उमेदवारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी उमेदवारांना नियमांच्या चौकटीत राहून निवडणूक पार पाडावी लागते. या नियमांच्या चौकटीत प्लॅस्टिक बंदीचीही भर यावेळी पडली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत बुधवारपासून ‘सिंगल युज’ प्लॅस्टिक वापराविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

निवडणूक आयोगानेही ‘से नो टू प्लॅस्टिक’चा नारा दिला आहे. निवडणूक काळात पोस्टर, बॅनर, कटआऊट, कार्यकर्त्यांना दिले जाणारे खाद्य पदार्थांचे पॅकेटस्‌, पाण्याच्या बाटल्या तसेच विविध प्रकारचे प्रचार साहित्य या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापर होतो. त्याचा विपरित परिणाम पर्यावरणावर होत आहे. मानव तसेच प्राण्यांना प्लॅस्टिकच्या वापराची भविष्यात मोठी हानी सहन करावी लागणार आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर टाळावा.

पर्यावरण पूरक प्रचार साहित्याचा वापर करावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. उमेदवारांबरोबरच निवडणूक यंत्रणेलाही याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निवडणुकीतील प्लॅस्टिकच्या वापरावर लक्ष केंद्रीत केले आहे. कारवाई टाळण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कारवाईची मोहीम सुरु आहे. क्षेत्रीय स्तरावरील पथकामार्फत ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्लॅस्टिक वापराबाबत कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमलेली नाहीत. परंतु, सध्या कार्यरत पथकांचाच यावर वॉच राहील. प्लॅस्टिक आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.