BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : जात प्रमाणपत्र वैध; भाजपच्या कुंदन गायकवाड यांना नगरसेवकपद बहाल

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – चिखलीतील भाजपचे कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र फेरतपासणीत वैध ठरले आहे. त्यामुळे गायकवाड यांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवकपद पुन्हा बहाल करण्यात आले आहे. यामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गायकवाड यांना पुन्हा नगरसेवकपद बहाल करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार गायकवाड यांनी चिखली प्रभाग क्रमांक एक-अ या राखीव जागेवर निवडणूक लढविली होती. ती जागा अनुसूचित जातीसाठी राखीव होती. त्यांनी कैकाडी जातीचे जातप्रमाणपत्र दाखल केले होते. बुलडाणा जिल्हा जातपडताळणी प्रमाणपत्र समितीने नगरसेवक गायकवाड यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवत ते अनुसूचित जातीत मोडत नसल्याचा निकाल दिला होता.

त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व बाबी तपासून गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द केले होते. त्यानंतर गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेत बुलडाणा जिल्हा जातपडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती आणली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या फेरतपासणीत जात प्रमाणपत्र वैध ठरले आहे. त्यामुळे गायकवाड यांचे नगरसेवकपद पुन्हा बहाल करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद कायम करण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गायकवाड यांना सोमवारी (दि.15)नगरसेवकपद बहाल करण्यात आले आहे”

HB_POST_END_FTR-A4

.