Pimpri: साडेतीन हजार ‘सीडबॉल’ टाकून साजरा करणार पर्यावरण दिन

एमपीसी न्यूज – पर्यावरणाच्या रक्षण आणि संवर्धनासाठी पुण्यातील दोन महिला एकत्र येऊन सुरू केलेल्या निगडी येथील “अर्थबीट” संस्थेच्या वतीने साडेतीन हजार बियांचे गोळे (सीडबॉल) टाकून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सीडबॉल द्वारे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे. हे वृक्षारोपण पर्यावरण दिनी (बुधवारी) सकाळी नऊ वाजता पाषाण टेकडी येथे होणार असल्याची माहिती संचालिका प्रा. प्राजक्ता नरुटे आणि चैताली देशपांडे यांनी दिली.

स्थापत्य अभियांत्रिकी आणि मास्टर ऑफ इंव्हायर्मेंट्ल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या प्राजक्ता नरुटे आणि जैविक तंत्रज्ञानाची मास्टर पदवीधर असलेल्या चैताली देशपांडे यांनी कचरा व्यवस्थापनात स्थिरता, महिला सशक्तीकरण, पर्यावरण संवर्धन या त्रिआयामी संकल्पनेतून विविध उत्पादनांची निर्मिती केली आहे.

  • रद्दीपासून सीडपेपर (बिया असलेला कागद) जैवीक कचरा व गोठ्यातील शेण वापरून सीडबॉल, सॅंपलिंग कप, प्लॅस्टिकविरहीत कुंडी (पॉट) या पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती केली.

टाकवू पेपरपासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक पेपरमध्ये बियांचा समावेश करून सीड पेपर तयार केला. तसेच जमिनीवरचे विघटन होणा-या पर्यावरण पूरक घटकामंध्ये बियांचा समावेश करून आकर्षक असे सीडबॉल तयार केलेत. हे सीडबॉल कुठेही जमिनीवर ठेवल्यास पाण्याच्या संपर्कात आल्यास त्यापासून रोपटे तयार होते. 6 महिने टिकणारे हे सीडबॉल 15 दिवस पाण्याशिवाय राहू शकतात.

  • पेपर व बॉल मध्ये 5 /6 बिया समाविष्ट केलेल्या आहे. या उत्पादनांचा व्यक्तिगत भेट किंवा कॉर्पोरेट गिफ्ट देण्यासाठी वापरला जावू शकतो. या उपक्रमातून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रा. नरुटे व देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.