Pimpri: केंद्राचे ‘पॅकेज’ हा आकड्यांचा खेळ – डॉ. अमोल कोल्हे

कोरोनाच्या तपासण्या वाढविण्याची आवश्यकता

एमपीसी न्यूज – कोरोनातून बाहेर पडण्याचा आराखडा अद्यापर्यंत केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळे लॉकडाऊन उघडल्यानंतर अधिक धोका वाढू शकतो, अशी भिती व्यक्त करत केंद्राने दोन दिवसांपूर्वी जाहिर केलेले पॅकेज हे आकड्याचा खेळ आहे, अशी टीका शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. तसेच कोरोनाच्या तपासण्या वाढविण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

महापालिकेच्या वतीने सुरु केलेल्या ‘कोविड 19 वॉर रुम’ला खासदार डॉ. कोल्हे यांनी आज (शुक्रवारी) भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाच्या तपासण्यांची संख्या कमी आहे.

त्यामुळे आपण स्वत:ला फसवितो की जगाला हे कळत नाही. तपासण्या वाढविण्याची गरज आहे. लॉकडाऊन हा कोरोनाला थांबविण्याचा एकमेव पर्याय नाही, हे आता सिद्ध झाले आहे.

अधिक काळाचा लॉकडाऊन हा देशाच्या हिताचा नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून केंद्राकडून देण्यात येणा-या सूचना आणि आदेशांचा गोंधळ सुरू असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला असल्याचे सांगत खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी पॅकेज जाहिर केले. हा आकड्यांचा खेळ दिसून येतो.

थेट किती लाभ मिळणार याबाबत स्पष्टता नाही. आपण केंद्राच्या समितीला प्रमुख सहा सूचना केल्या होत्या. त्यापैकी स्थलांतरित कामगारांचा प्रश्न सोडून अन्य विषयांवर कार्यवाही झाली नाही, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.