Pimpri: शहरातील कोरोना बळींचे शतक ; 11 दिवसात 55 जणांचा मृत्यू

Centuries of corona victims in the city; 55 deaths in last 11 days : मृतांमध्ये विविध आजार असलेल्या वृद्धांसह युवकांचा समावेश

कोरोनामुळे शहरातील 101, शहराबाहेरील 38 अशा एकूण 139 जणांनी गमावले प्राण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर, दुसरीकडे कोरोना बळींची संख्याही शंभरी पार झाली आहे. मागील 11 दिवसात 55 जणांचा मृत्यू झाला. आज आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. 12 एप्रिलपासून 11 जुलैपर्यंत शहरातील तब्बल 101 जणांचा कोरोनाने बळी घेतला.  तर, पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेणा-या हद्दीबाहेरील 38 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला. मृतांमध्ये विविध आजार असलेल्या वृद्धांसह युवकांचा समावेश होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत शहरातील 101 आणि शहराबाहेरील 38 अशा एकूण 139 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 6909 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

तर 3847 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 2961 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी झाला होता. यामध्ये थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत शहरातील 101 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

शहरातील कोरोनाच्या एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचा आकडा अवघा दीड ते पावणेदोन टक्के असला तरी तो चिंताजनक आहे. मागील 11 दिवसात शहरातील 55 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

मागील काही दिवसांपासून दिवसाला सात ते आठ जणांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये 40 च्या आसपास वय असलेल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

मृतांमध्ये युवकांचाही समावेश आहे. तर वयोवृद्ध आणि कोरोनासह विविध आजार असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. मृत्यू झालेले अनेक रुग्ण संसर्ग झाल्यानंतर उशीरा उपचारासाठी दाखल झाले होते.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काहींचा मृत्यू तीन चार दिवसांत, काहींचा मृत्यू अवघ्या काही तासांत झाला आहे. वाढत्या रूग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.

मृतांमध्ये विविध आजार असलेल्या रुग्णांचे अधिक प्रमाण आहे. त्यामुळे विविध आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर पूर्वीचे आजार डोकेवर काढतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.

लक्षणे विरहित रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारावा – अतिरिक्त आयुक्त

मागील काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. विविध गंभीर आजार असलेल्या रुग्णांची संख्या मृतांमध्ये जास्त आहे. रुग्णांनी आजार लपवून ठेऊ नयेत. उपचाराकरिता लवकर पुढे यावे. सुरक्षित अंतर आणि मास्कचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

या दोन्ही नियमांचे व्यवस्थित पालन केल्यास जवळपास 70 ते 80 टक्के लोकांना संसर्ग होण्यापासून वाचवू शकतो.वाचणे शक्य आहे. तसेच उर्वरित रुग्णांवर व्यवस्थित रुपचार करता येतील.

लक्षणे विरहित जास्तीत-जास्त रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारायला हरकत नाही. जेणेकरुन लक्षणे असलेल्या रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करु शकतो, असे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.