Pimpri: बंडोबांना थंड करण्याचे नेत्यांपुढे आव्हान; युती आणि आघाडीतही बंडखोरी

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी आणि महायुती असतानाही अनेकांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. अर्ज माघार घेण्याची उद्याची अंतिम मुदत उद्या (सोमवार) असल्याने बंडोबांना थंड करण्याचे आव्हान पक्ष नेतृत्वापुढे आहे.

युतीमध्ये पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला तर चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ भाजपला सुटला आहे. आघाडीत तीनही मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटले होते. परंतु, राष्ट्रवादीने केवळ पिंपरीत उमेदवार दिला आहे. भोसरीत अपक्षाला पुरुस्कृत केले. तर, चिंचवडमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला असून अद्यापर्यंत कोणालाही पाठिंबा दिला नाही.

पिंपरी मतदारसंघातून महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु, भाजपचे अमित गोरखे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, भीमा बोबडे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी बंडखोरी केली आहे.

राष्ट्रवादीने अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, अगोदर उमेदवारी देऊन पत्ता कट केलेल्या नगरसेविका सुलक्षणा धर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचेच नगरसेवक राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ यांना अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मित्र पक्षाचे काँग्रेसचे मनोज कांबळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यांची बंडखोरी शमविण्यात पक्षश्रेष्टीला यश येते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे लक्ष्मण जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तर, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आघाडीचा उमेदवारच चिंचवडमध्ये नाही. कलाटे माघारी घेतात का? महाआघाडी कोणाला पाठिंबा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोसरीत मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे महेश लांडगे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार विलास लांडे यांना पुरुस्कृत केले आहे. नगरसेवक दत्ता साने यांनी देखील अर्ज दाखल केला असून ते माघार घेण्याची दाट शक्यता आहे. अर्ज माघारीनंतर उद्या शहरातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.