Pimpri: महापालिका दवाखान्यांच्या वेळेत बदल, आता नऊ वाजता उघडणार दवाखाने

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अखत्यारित आठ रुग्णालये आणि 28 दवाखाने कार्यरत आहेत. या दवाखान्यांमध्ये शहरातील गरीब व गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. हे दवाखाने सकाळी आठ वाजता सुरू होतात. सकाळी रुग्णांचा प्रतिसाद कमी असल्याने या वेळेत बदल करून दवाखाने सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

महापालिकेचे रुग्णालय व दवाखान्यांमध्ये रुग्णांवर औषधोपचार व्यतिरिक्त शासकीय योजनांचा लाभ देणे, राजीव गांधी योजना राबविणे अशा सुविधा पुरविल्या जातात. नागरिकांच्या सोयीसाठी दुपारी एक वाजेपर्यंत दवाखाने सुरू असतात. त्यानंतर दवाखान्यातील डॉक्टरांना राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत येणारे कामकाज तसेच कुटुंब कल्याण अंतर्गत येणार्‍या सभा यांना वेळ कमी मिळतो. कुटुंब नियोजन अंतर्गत घेतल्या जाणार्‍या बैठका सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत सुरू असतात.

त्यामुळे डॉक्टर व कर्मचारी यांनीही वेळ बदलण्याबाबत वारंवार मागणी केली होती. त्यानुसार, रुग्णालये व दवाखाने यांची वेळ बदलण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 5 अशी दवाखान्याची वेळ असेल. त्यामध्ये ओपीडी सकाळी 9 ते 1 या वेळेत सुरु राहील. शनिवारी दवाखान्याची वेळ सकाळी 9 ते 1 अशी असेल. त्यामध्ये सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत ओपीडी सुरू असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.