Pimpri : ‘त्या’ बँकेची तपासणी करण्याचे सहकार आयुक्‍तांचे आदेश

दि. सेवा विकास को-ऑप.बँक लि.मध्ये संचालक मंडळाकडून कोट्यवधींचा अपहार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहरामध्ये नामांकित असलेल्या दि. सेवा विकास को-ऑप.बँक लि.मध्ये संचालक मंडळाने कोट्यवधींचा अपहार केला असून सतिश सोनी, सहकार आयुक्‍त आणि निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी बँकेचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश (आदेश क्र. जा.क्र.सआ/लेखापरीक्षण/कार्या-19/सेवा विकास बँक/चालपे/164/2019) 14 फेब्रुवारी 2019 रोजी दिले आहेत, अशी माहिती बँकेचे माजी चेअरमन धनराज नथुराज आसवाणी यांनी शनिवारी (दि. 16 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत दिली.

संचालक मंडळाने कोणतेही वाहन खरेदी न करता बनावट कागदपत्रांच्या आधारांवर वाहन कर्ज मंजूर करून वाटप केले आहे. संचालक मंडळाच्या संगनमताने बँकेच्या आर्थिक हितास बाधा पोहचत आहे. आक्षेपित खात्‍यांसह रु. 50 लाखांपुढील सर्व कर्ज खात्‍यांची चौकशी करण्याचेही आदेश सहकार आयुक्‍तांनी दिले आहेत, असे आसवाणी यांनी सांगितले.

  • धनराज आसवाणी हे 2017-18 मध्ये पिंपरी चिंचवड मनपा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार होते. आता ते डेअरी फार्म शक्‍ती केंद्रप्रमुख तसेच शहर भाजपचे उपाध्यक्ष आहेत. सभासदांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारींमध्ये तथ्य असल्यामुळेच सहकार आयुक्‍तांनी तपासणी करण्याचे आदेश दिले.

अशा प्रकारे कोट्यवधी खातेदार, सभासद, ठेवीदारांच्या पैशावर डल्‍ला मारणा-या सेवा विकास बँकेच्या संचालक मंडळावर कडक कारवाई करून त्यांच्याकडून बँके खातेदार, सभासदांच्या पै-पैचा हिशोब घेऊन तो वसूल करण्यात यावा, अशी मागणी आसवाणी यांनी यावेळी केली.
याबाबतीत बॅंकेशी संपर्क साधला असता याबाबतचे उत्तर पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.