Pimpri: शहरातील चिकन, मटनची दुकाने ‘या ‘तीन दिवशीच खुली राहणार; सील केलेल्या भागातील दुकाने पूर्णपणे बंद

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे महापालिकेकडून खबरदारीची पाऊले उचलली जात आहेत. शहरातील चिकन, मटनची दुकाने सोमवार (दि.20) पासून आठवड्यातील बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे तीन दिवसच खुली राहणार आहेत. तर, सील केलेला भागातील दुकाने पुढील आदेशापार्यत पुर्णत: बंद राहणार आहेत. या भागातील पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांनी दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. आजपर्यंत 47 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. येत्या काळात शहरात रुणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरीकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे.

भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे संभाव्य होणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मानवी आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव आहे. याकरीता कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आदेश लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार निर्णय
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व चिकन, मटणची येत्या सोमवार (दि.20) पासून आठवड्यातील तीनच दिवस सुरु राहणार आहेत. बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुकाने सुरु राहणार आहेत. इतर दिवशी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. कॉन्टेमेंट एरिया/ बॅरिगेटींग एरिया यामधील चिकन/मटण दुकाने पुर्णत: बंद राहणार आहेत. त्यानुसार या भागातील संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

‘यामुळे’ घेतला निर्णय!
पिंपरी-चिंचवड शहरातील एका चिकण विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या कुटुंबियांला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभुमीवर महापालिकेने शहरातील चिकन, मटनची दुकाने आठवड्यातील तीन दिवसच खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.