Chinchwad : कोरोनाबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरवणाऱ्यांवर ‘सायबर सेल’चा ‘वॉच’

पिंपरी-चिंचवडसाठी सनियंत्रक म्हणून पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची नेमणूक

एमपीसी न्यूज – कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणारे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी आगामी काळात चुकीचे मेसेज पसरावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सायबर सेलकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरासाठी सनियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे.

 

करोना विषाणूने भारतातच नव्हे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही शिरकाव केला आहे. याबाबत सोशल मीडियावर अफवा पसरविणा-या बातम्यांचा पाऊस पडत आहे. सोशल मीडियावर आलेल्या ‘पोस्ट’ची कोणतीही शहानिशा न करता नेटकरी ती ‘पोस्ट’ आहे अशी ‘फॉरवर्ड ‘करीत आहेत. परिणामी करोनाबाबत नागरिकांमध्ये एक प्रकरे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काही खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशा पोस्ट जाणीवपूर्वक व्हायरल केल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशानुसार सायबर सेलकडून काही पोस्टचा डाटा संकलित करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे आगामी काळात चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळे पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याची शक्यता आहे.

 

सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे म्हणाले की, “सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक पोस्टवर सायबर सेल ‘वॉच’ ठेऊन आहे. त्यामुळे सोशल मीडियावर करोना किंवा रुग्णांबाबत चुकीच्या पोस्ट व्हायरल करून नका. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.”

 

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची सनियंत्रकाची नेमणूक

 

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्ह्यात आपत्ती व्यव्यस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये करोनाबाबत व्यवस्थापन, तयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणीकरीता पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची सनियंत्रणक पदी नेमणूक करण्यात आली आहे.

संबंधित ठळक बातम्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.