Pimpri : बाल-कुमारांनी कवितेतून राज्यातील गंभीर विषय मांडून केले विचारप्रवृत्त

एमपीसी न्यूज – ‘लहान तोंडी मोठा घास’ ही उक्ती खरी ठरवत बाल-कुमारांनी दुष्काळ, पर्यावरण, अवकाळी पाऊस, स्त्री भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या अशा महाराष्ट्रापुढील गंभीर विषयांवर कविता सादर करीत सभागृहाला विचारप्रवृत्त केले. शब्दधन जीवन गौरव काव्यमंचातर्फे आयोजित पहिल्या शब्दधन जीवन गौरव राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलनात दुपारच्या सत्रात निमंत्रित बालकांचे कविसंमेलन उत्साहात पार पडले.

यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अरुण पवार, कार्यक्रमाचे स्वागत प्रमुख पितामह कोष्टी,संमेलनाचे समन्वयक प्रा. संपत गर्जे, शब्दधन जीवन गौरव
काव्यमंचाचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सरोज पंडित, विजय अंधारे, बापू डिसोजा, पुनम पाटील, मीनाक्षी डफळ, अलका
बोर्डे, विजय लोंढे, पांडुरंग पवार, सीमा गांधी, पुष्पा सदाकाळ, उत्कर्ष शिरसाट, अनुष्का गर्जे, विकास बोडके, सभा शेख, उत्कर्ष बुधवंत, आर्या शेवाळे, ऐश्वर्या कुलकर्णी, गणेश पाचारणे, आदिती वायाळ, प्रमुख पाहुणे म्हणून पारू कडाळे, दीपक अमलिक, प्रा. अनिता सुळे उपस्थित होते.

साधना शेलार या बालकवयित्रीने सादर केलेली ‘मुलगी’ ही कविता रसिकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली. स्त्रीभ्रूण हत्या रोखा, जन्मापूर्वी मला गर्भातच मारू नका, असा या कवितेचा अन्वयार्थ होता. ईश्वरी गवळी हिने ‘आई वडिलांच्या अपेक्षा’ कविता सादर करत मुलगी वाचवा हा संदेश दिला. कृष्णा कांबळे या कवीने दमदार आवाजात सादर केलेली ‘पाऊस’ कविता अंगावर शहारे आणणारी होती. या कवितेने रसिकांच्या उत्स्फूर्त दाद घेतली. ‘पावसाने दिला शाप’ कविता सादर करीत पल्लवी सुपुत्रे हिने दुष्काळ, अवकाळी पावसामुळे शेती- घरेदारांचे झालेले प्रचंड नुकसानाने खचलेल्या मनाचा ठाव कवितेतून घेतला.

‘सकाळ झाली उठुया, रात्रीला बाय बाय करूया, स्वच्छ भारत करूया, रोगांना आपण घालवूया’, कविता सादर करून स्वच्छ भारतासाठी मूल्ये जपण्याचे आवाहन गौरव अनारसे या विद्यार्थ्याने आपल्या कवितेतून रसिकांना केले. पूर्वा वैभव सोनवणे या चार वर्षाच्या चिमुकलीने ‘आभाळातून पडले कमळाचे फुल’ कविता सादर करीत रसिकांची वाहवा मिळविली. टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या कवितेला उत्स्फूर्त दाद दिली. शिवांजली वणारसे हिने पाऊस कविता सादर केली.

समीक्षा लहिरे या विद्यार्थिनीने ‘धर्म’ कविता सादर केली. तिने कवितेतून ‘आपण सर्व एकाच धर्माचे आहोत, त्यामुळे भेदाभेद विसरून सशक्त भारत घडवूया
हा संदेश दिला. आरती जाधव हिने ‘गरज फक्त परिवर्तनाची’ कवितेतून कर्जमाफी, आत्महत्या करण्याच्या मनोवृत्तीतून बाहेर पडावे, समान हक्क मिळावेत, पर्यावरणाचा समतोल राखला जावा अशा अपेक्षा व्यक्त करीत रसिकांना विचारप्रवृत्त केले. वैशाली वाळके हिने पक्ष्यांची शाळा सादर करीत शाळेविषयी संकल्प केला.

सार्थक हिंगणे याने ‘मला सहलीला जायचंय’ कविता सादर केली. ऐश्वर्या कुलकर्णी हिने ‘निसर्गाचा नियम’ कविता सादर केली. यातून तिने वृक्षतोड, प्रदूषण याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कैलास गुंजाळने ‘देवाकडे मागणे’ सादर करीत रसिकांना बालपणाच्या आठवणींत नेऊन ठेवले. स्वानंद पारखी, गौरी शिंदे, भक्ती बुधवंत, प्रीती पठारे, गौरी कारके, स्तुती क्षेत्रे, दीपाली लोणारे यांनीही कविता सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.

तत्पूर्वी, सोमनाथ वाघ यांनी ‘खैरलांजी पुन्हा घडणार नाही’, हा नाट्याविष्कार सादर करीत रसिकांना विचारप्रवृत्त केले. कलीम तांबोळी यांनी कथाकथन सादर करीत संपूर्ण रसिकांना हास्यकल्लोळात घेऊन गेले. नाट्याविष्कार व कथाकथन या सत्राच्या अध्यक्षस्थानी नागेश शेवाळकर होते.सूत्रसंचालन निरुमा भेंडे, सोमनाथ वाघ, वंदना इंनानी, मनिषा भोसले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.