Chinchwad: एटीएम फोडून पैसे काढले, मशीन मुळा-मुठा नदीत फेकून दिले; सराईत चोरटे अटकेत

Pimpri- Chinchwad: ATM thieves caught in Pimpri-Chinchwad by Crime Branch त्यामुळे पिकअपच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता पिकअप मालकाने त्यांचे पिकअप वडकी फाटा, सासवड रोड येथे मिळून आल्याचे सांगितले.

एमपीसी न्यूज- चिंचवड मधील थरमॅक्स चौकातून आयसीआयसीआय बँकेचे एटीएम चोरून नेले होते. लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारचा गंभीर गुन्हा असल्याने पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी सलग पाच दिवस अहोरात्र मेहनत घेत हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेत या गुन्ह्याची उकल केली आहे.

अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय 20, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर), शेऱ्या उर्फ श्रीकांत विनोद धोत्रे (वय 23, रा. गाडीतळ हडपसर) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. एटीएम चोरीचा गुन्हा घडल्यानंतर विशेष तपास पथक आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार पोलिसांनी वाहन, वाहन मालक, चोरीचा मार्ग असा विस्तृत तपास सुरु केला.

दरम्यान, 8 जून रोजी होळकरवाडी, औताडेफाटा येथून एक पिकअप चोरीला गेली असून त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याच पिकअपचा वापर करून चिंचवड येथील एटीएम मशीन चोरण्यात आले होते.

त्यामुळे पिकअपच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता पिकअप मालकाने त्यांचे पिकअप वडकी फाटा, सासवड रोड येथे मिळून आल्याचे सांगितले.

त्यानंतर, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून तपासाची चक्रे फिरवली. सुमारे 90 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढला.

हडपसर येथील महात्मा फुले नगर भागात सापळा लावून पोलिसांनी आरोपी अजयसिंग, शेऱ्या आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेतले. त्या तिघांनी त्यांच्या आणखी तीन साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

अशी झाली होती चोरी 

थरमॅक्‍स चौक येथील नवमी हॉटेलजवळ आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. 9 जून रोजी पहाटे पाच चोरटे पिकअप व्हॅनमधून आले. त्यांनी एटीएमला दोरखंड बांधला आणि एटीएम बाहेर ओढून काढले.

एटीएम हालल्यामुळे एटीएम सेंटरमधील धोक्‍याची सूचना देणारा सायरन वाजला. सायरन वाजत असतानाही चोरट्यांनी ओढून बाहेर आणलेले एटीएम गाडीत टाकले आणि धूम ठोकली.

सायरनचा आवाज ऐकून जवळच असणारा एक सुरक्षा रक्षक सावध झाला. त्याने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षास याबाबतची माहिती दिली.

या एटीएममध्ये सात जून रोजी दहा लाखांची रोकड भरण्यात आली होती. 9 जून रोजी 5 लाख 71 हजार रुपये एवढी रक्कम शिल्लक होती.

चोरलेले एटीएम मुळामुठा नदीत सापडले

आरोपींनी एटीएम चोरी करण्यासाठी होळकरवाडी येथून एक महिंद्रा पिकअप चोरी केले. चोरी केलेला पिकअपचा वापर करून चिंचवड येथील एटीएम चोरून नेले. चोरलेले एटीएम मांजरी भागात मुळामुठा नदीकिनारी नेऊन हँडग्रँडर (कटर), हातोडी व छन्नीने तोडले.

त्यातील रोख रक्कम चोरट्यांनी आपसात वाटून घेतली. त्यानंतर एटीएम नदीमध्ये उतरून पद्धतशीरपणे मध्यभागी फेकून दिले. चोरून आणलेले पिकअप वडकीफाटा, सासवडरोड येथे रस्त्याच्या बाजूला सोडून दिले.

आरोपींकडे केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला. पोलिसांनी मुळामुठेच्या खोल पाण्यातून एटीएम काढले. एटीएम मशीन पाण्यातून हस्तगत करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

चोरट्यांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त

पोलिसांनी आरोपींकडून 7 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यामध्ये महिंद्रा पिकअप तीन लाख रुपये, एटीएम मशीन साडेतीन लाख रुपये, रोख रक्कम 1 लाख 40 हजार रुपये, एटीएम ओढण्यासाठी वापरलेला लोखंडी वायर रोप, इलेक्ट्रीक केबल तसेच एटीएम कापण्यासाठी वापरलेले हँडग्रँडर 18 हजार रुपये, लोखंडी खंजीर एक हजार रुपये, हिरो होन्डा पॅशन मोटार सायकल 40 हजार रुपये आदींचा समावेश आहे.

आरोपींनी एटीएम चोरीच्या गुन्ह्यासोबत दिली आणखी चार गुन्ह्यांची कबुली

एटीएम चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी एटीएम चोरीच्या गुन्ह्यासोबत वाहन चोरी आणि घरफोडीच्या आणखी चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

हे चार गुन्हे लोणी काळभोर आणि सासवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपी अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात 10 वाहन चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी रविंद्र गावंडे, प्रमोद लांडे, सोमनाथ बो-हाडे, अमित गायकवाड, महादेव जावळे, सचिन उगले, नितीन खेसे, प्रविण पाटील, विशाल भोईर, किशोर परदेशी, सचिन मोरे, विजय मोरे, गणेश सावंत, मारूती जायभाये, प्रमोद हिरळकार, आनंद बनसोडे, प्रमोद गर्जे, अजंनराव सोडगिर यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.