Pimpri News : पिंपरी चिंचवडचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाडची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड 

एमपीसी न्यूज – भारत आणि श्रीलंका यांच्यात जुलैमध्ये एकदिवसीय व T20 मालिका रंगणार आहे. या मालिकेचे नेतृत्व सलामी फलंदाज शिखर धवन याच्याकडे देण्यात आले आहे. तीन एकदिवसीय व तीन T20 सामन्यासाठी पिंपरी चिंचवडचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड याची निवड करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडची प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. 

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने 20 जणांच्या भारतीय संघाची निवड केली. ‘आयपीएल’मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना 24 वर्षीय ऋतुराजने सातत्याने छाप पाडली. राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतन साकारिया याला देखील प्रथमच भारतीय संघात स्थान लाभले आहे. इशान किशन आणि संजू सॅमसनकडे यष्टीरक्षणाची, तर भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उभय संघात तीन एकदिवसीय व तीन T20 सामने खेळवले जातील. 13, 16 आणि 18 जुलै रोजी एकदिवसीय तर, 21, 23 आणि 25 जुलै रोजी T20 सामने खेळवले जाणार आहेत. दोन्ही मालिकांचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन याच्याकडे सोपविण्यात आले आहे. तसेच संघात उमद्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

* असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ 

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.