Pimpri: भाजप कार्यकारिणीला मिळेना मुहूर्त, सरचिटणीसपदावरुन रस्सीखेच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड होऊन तब्बल दोन महिने झाले. पण, शहर कार्यकारिणी मात्र जाहीर करण्यात आली नाही. सत्तेतील पक्ष असल्याने सरचिटणीस पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. अनेक जण इच्छुक असल्याने कार्यकारिणी जाहीर करण्यास मुहूर्त मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच या कार्यकारिणीला आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्यांचा मिलाफ कसा साधला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या शहराध्यक्षपदी महेश लांडगे यांची 16 जानेवारी 2020 रोजी निवड करण्यात आली. त्यांची निवड होऊन तब्बल 53 दिवस झाले. परंतु, पक्षाची कार्यकारिणी मात्र अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आली नाही. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. कार्यकारिणीत पदाधिकारी असणा-यांना महापालिकेतील पदे देताना प्राधान्य दिले जाते. महापालिकेत काम करण्याची संधी मिळते. मागील कार्यकारिणीतील सरचिटणीस माउली थोरात, बाबू नायर आणि युवा मोर्चाचे मोरेश्वर शेडगे यांना स्वीकृत नगरसेवक पद मिळाले आहे. सत्तेत असल्याने भाजपच्या संघटनेतील पदाधिका-यांना महापालिका अधिका-यांकडून महत्व दिले जाते. संघटनेतील पदाच्या माध्यमातून कामे करुन घेता येतात. त्यामुळे कार्यकारिणीत संधी मिळावी म्हणून भाजपमध्ये अनेकजण इच्छुक आहेत.

भाजपच्या मागील कार्यकारिणीत सहा सरचिटणीस होते. त्यामध्ये संघटन सरचिटणीसपदावरुन घमासान झाले होते. प्रदेश नेतृत्वाकडून संघटन सरचिटणीसपद खेचून आणले होते. त्यानंतर तीन जणांना संघटन सरचिटणीस केले होते. आता देखील सरचिटणीसपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यावरुन रस्सीखेच सुरु आहे. चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप आमदार आहेत. त्यामुळे चिंचवडमधील संघटनेतील पदाधिकारी त्यांच्या मर्जीने निवडले जातील. परंतु, पिंपरीत राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे पिंपरी आणि भोसरीतील पदाधिकारी शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मर्जीने निवडले जातील.

मागील कार्यकारिणीवर तत्कालीन शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे वर्चेस्व होते. त्यांच्या मर्जीतील कार्यकारिणीत पदाधिकारी होते. त्यामुळे मागील कार्यकारिणीलाच संधी दिली जाते की आमदार महेश लांडगे आपल्या निकटवर्तींना कार्यकारिणीत संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नवीन कार्यकारिणीला फेब्रुवारी 2022 मध्ये होणा-या आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कार्यकारिणीत जुन्या आणि नव्यांचा मिलाफ कसा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत बोलताना शहराध्यक्ष महेश लांडगे म्हणाले, ”शहर कार्यकारिणी अंतिम केली आहे. अंतिम मान्यतेसाठी कार्यकारिणीची यादी प्रदेशकडे पाठविण्यात येईल. प्रदेशची मान्यता मिळाल्यानंतर कार्यकारिणी जाहीर केली जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.