Pune : मोठी बातमी! पुणे व पिंपरी-चिंचवड कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित; दोन्ही शहरांच्या सीमा बंद

एमपीसी न्यूज – मागील दहा दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत कोरोना विषाणूचा सामुदायिक प्रसार सुरू होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे संपूर्ण पुणे महापालिका क्षेत्र व संपूर्ण पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्राला कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित विभाग) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या आदेशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व सीमा 27 एप्रिलपर्यंत सील करण्यात येणार आहेत. 

याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी रविवारी (दि. 19) रात्री 12 वाजल्यापासून 27 एप्रिल 2020 पर्यंत केली जाणार आहे.

27 तारखेनंतर तत्कालीन परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल. 20 एप्रिलनंतर शहरात ठराविक उद्योगांना कामकाजात सवलती दिल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कोरोना हॉटस्पॉट असलेल्या शहरात कंटेन्मेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार दोन्ही महापालिका आयुक्तांनी दोन्ही शहरांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे.

आदेशातील महत्वाचे मुद्दे – (पिंपरी चिंचवड शहरासाठी)

# आज 19 एप्रिल रात्री बारा पासून 27 एप्रिल पर्यंत आदेश लागू राहणार

# शहराच्या सीमा बंद

#  22 तारखेपर्यंतच पोलिसांनी (अंतर्गत प्रवास) दिलेले पास ग्राह्य राहणार. त्यानंतर महापालिकेकडून नवीन पास काढावे लागणार.

# बँका सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत राहणार सुरू. एटीएम सेंटर सुरू राहणार.

# अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकांनांचा कालावधीही कमी. दूध, फळे, भाजीपाला विक्रीसाठी प्रशासनाने दिलेल्या जागेत विक्री करावी लागणार. घरपोच सेवेसाठी प्रशासनाकडून पास घ्यावा लागणार. ही विक्री सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार.

# चिकन, मटण विक्री सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार.

# जीवनावश्यक वस्तू, औषधे, तयार अन्न घरपोच वाटप सकाळी 8 ते 10 महापालिकेकडून पास घेऊन सुरू राहणार.

# दवाखाने, मेडिकल दुकाने सुरू राहणार

# शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पास दिले जातील

# मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यवहारांना आदेशातून वगळण्यात आले आहे.

# महापालिका, पोलीस, राज्य, केंद्रीय विभागाचे कर्मचारी, वाहने, अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा करणारी वाहने यांना वगळण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.