Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे तीन तेरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कोणी कुठूनही वाहने चालवताना, तसेच रस्त्याच्या मधोमध वाहने थांबवून गप्पा मारताना आढळून येत आहेत. पीएमपीएमएल बस थांब्याच्या समोर चक्क रिक्षा स्टॉप सजवून रिक्षा चालक प्रवासी नागरिकांची चांगलीच गोची करत आहेत. त्यामुळे प्रवासी नागरिकांना भर रस्त्यावर बसची वाट पाहावी लागत आहे. परिणामी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र शहरातील बहुतांश चौकांमध्ये पाहायला मिळते.

पिंपरी-चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्टेशन रोड दरम्यान असलेल्या बस थांब्यासमोर रिक्षा चालकांनी रिक्षा स्टॉप बनविला आहे. अधिकृत बस स्टॉपमध्ये कोणीही थांबत नाही. सर्व प्रवासी नागरिक रिक्षाच्या समोर बसची वाट पाहत उभे राहतात. यामध्ये रस्त्याची संपूर्ण एक लेन जाते. उरलेल्या एका लेनमध्ये दोन्ही बाजूंची वाहतूक होत आहे. जवळच असलेल्या मुख्य चौकात सतत वाहतूक पोलीस असतात. वाहतूक पोलीस याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. यामुळे रिक्षा चालकांची मुजोरी वाढत आहे.

चिंचवड मधील स्टेशन चौकात रिक्षा चालक भर रस्त्यात रिक्षा थांबवून प्रवाशांची वाट पाहतात. त्यामुळे मागून येणा-या वाहनांना अडथळा होतो. पिंपरी मधील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर रिक्षा स्टॉप बनविण्यात आला असून यामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच या पुलावरून विरुद्ध दिशेने वाहतूक होण्याचेही प्रमाण जास्त आहे. अंतर वाचविण्यासाठी वाहन चालक जिवावरची कसरत करून विरुद्ध दिशेने वाहने चालवितात.

पादचारी मार्गांवर अतिक्रमण आणि अडथळे आहेत. त्यामुळे पादचा-यांना पदपथावरून न चालता रस्त्यावरून चालावे लागते. अनेक ठिकाणी पादचारी मार्गावर टप-या थाटल्या आहेत. तसेच काही ठिकाणी मागील काही दिवसांपासून विटा, वाळू असे साहित्य पडून आहे. सेंट्रल मॉल समोरील रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे पदपथ काढून रस्ता बनविण्यात आला आहे. तरीही या रस्त्यावर अडथळे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे वापरता येऊ शकत नसल्याची तक्रार अनेकजण करत आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील म्हणाले, “बेकायदेशीरपणे वाहतुकीला अडथळा निर्माण करणा-या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याबाबत संबंधित पोलीस अधिका-यांना सूचना दिल्या असून पोलिसांची कारवाई सुरु आहे. अशा प्रकारचे अडथळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.

वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेले शहरातील चौक

# पिंपरी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून स्टेशन रोडकडे जाताना, शगुन चौक
# चिंचवड – स्टेशन चौक, थरमॅक्स चौक
# आकुर्डी – खंडोबा मंदिर चौक
# निगडी – टिळक चौक, भक्ती शक्ती चौक
# भोसरी – पुणे-नाशिक उड्डाणपुलाखाली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.