Pimpri: कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आयुक्त अपयशी, बदली करा; सत्ताधारी भाजप नगरसेवकाची मागणी

Pimpri-chinchwad: Commissioner shravan hardikar fails to handle Corona's situation, do immediate transfer; Demand of ruling BJP corporator sandip waghere कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शहरामध्ये किमान 10 दिवसांची सक्त संचारबंदी लागू करावी.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर सपशेल अपयशी ठरले आहेत. आयुक्त हर्डीकर निष्क्रिय असल्याचा आरोप करत त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नगरसेवक संदीप वाघेरे यांनी म्हटले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे.

शहरातील रुग्णसंख्या 4269 वर पोहोचली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांत बाधित रुग्णांची संख्या रोज 200 ते 300 च्या वर जात आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित संख्या देखील झपाट्याने वाढत असल्याने निदर्शनास येत आहे.

पालिकेकडील बांधून तयार असलेली रुग्णालये तातडीने सुरु करणे गरजेचे आहे. तसेच पालिकेच्या ताब्यातील शाळा व इमारती देखील क्वांरटाइन सेंटर अथवा रुग्णालय म्हणून म्हणून सुरु करणे आवश्यक आहेत.

तसेच शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शहरामध्ये किमान 10 दिवसांची सक्त संचारबंदी लागू करावी. शहरातील संशयित व अन्य रुग्णांचे नमुने तपासणी वाढविणे गरजेचे आहे.

असे असताना देखील आयुक्त श्रावण हर्डीकर हे मात्र शांतपणे बसून आहेत. त्यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही करीत असल्याचे दिसून येत नाही.

महाराष्ट्रामध्ये मुंबई तसेच ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढल्या नंतर तेथील महापालिका आयुक्तांची राज्य सरकारने तात्काळ बदली केली. परंतु, पिंपरी- चिंचवड शहरामध्ये दररोज 200 ते 300 रुग्ण आढळून येत आहेत.

तसेच संशयित रुग्णांचा दिवसाचा आकडा 3751 पर्यंत गेलेला असताना. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज 1000 पर्यंत जाण्यास वेळ लागणार नाही अशी भीती वाघेरे यांनी व्यक्त केली. असे असताना देखील आयुक्त श्रावण हर्डीकर एवढे शांत कसे? हा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

वास्तविक आयुक्त श्रावण हर्डीकर यांची महापालिकेतील तीन वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे. शहराची कोरोना विषाणू संदर्भात अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली असताना आयुक्त हर्डीकर यांना महापालिकेच्या आयुक्त पदावर ठेऊन त्यांना बक्षिसी दिली जात आहे का? हा प्रश्न माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला पडत आहे.

या विषयाची तात्काळ दखल घेऊन आयुक्त हर्डीकर या निष्क्रिय अधिकाऱ्यांची बदली करावी. त्यांच्या जागी सक्षम व कार्यक्षम आयुक्तांची नेमणूक करण्याची आग्रही मागणी देखील वाघेरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.