Pimpri : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित

पालकमंत्र्यांच्या हस्ते आयुक्तालयाचे पाहिले ध्वजारोहण

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आज (बुधवार, दि. 15) ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. आयुक्तालयाचे पाहिले ध्वजारोहण पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. आयुक्तालयामुळे शहरातील गुन्हेगारी कमी होऊन कायदा आणि सुव्यवस्था उत्तम प्रकारे राखली जाणार आहे.

ध्वजारोहण समारंभासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, अॅड. गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हर्डीकर, इरफान सय्यद, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

ध्वजारोहण करून आयुक्तालय आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. आयुक्तालयासाठी मिळालेल्या प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे नूतनीकरणाचे काम वेगात सुरु आहे. संपूर्ण काम होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे. आयुक्तालयाची सर्व सूत्रे ऑटो क्लस्टर मधून हलणार आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडून 329 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी (दि. 14) काढले. पुणे ग्रामीण पोलिसांकडून वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये 34 सहाय्यक पोलीस फौजदार, 79 पोलीस हवालदार आणि 216 पोलीस नाईक, पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.

ऑटो क्लस्टर मध्ये दोन केबिन आणि एक हॉल पालिकेने पोलीस आयुक्तालयासाठी दिला आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांचे कार्यालय आहे. सध्या पुणे शहर आयुक्तालयाचे परिमंडळ तीन पोलीस उप आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचे देखील नुतणीकरणाचे काम सुरु आहे. या कार्यालयात पोलीस उप आयुक्त बसणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.