Chinchwad : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बायडेन यांच्या सोबतचा फोटो सोशल मिडीयावर केला शेअर

एमपीसी न्यूज – अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडेन यांचे भारत आणि मुंबई कनेक्शन आजवर चर्चेत होते. आता बायडेन यांचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बायडेन यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मिडीयावर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी डेमोक्रेटिक पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवली. बायडेन यांनी रिपब्लिकन पार्टी या पक्षाचे उमेदवार आणि 45 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. बायडेन यांनी 2009 ते 2017 या कालावधीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून देखील अमेरिकची धुरा सांभाळली आहे.

जो बायडेन यांच्या सोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकताच त्यांच्या सोशल मिडियावरून शेअर केला आहे. त्यामध्ये कृष्ण प्रकाश यांनी बायडेन यांना 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

बायडेन यांच्या भेटीबद्दल सांगताना कृष्ण प्रकाश म्हणाले, “जो बायडेन अमेरिकचे उपराष्ट्राध्यक्ष असताना सन 2013 मध्ये मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी मी साउथ मुंबई विभागात अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होतो. बायडेन यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर होती. बायडेन यांच्या दौऱ्यात मुंबई पोलिसांनी उत्तम सुरक्षा पुरवली. त्यानंतर बायडेन यांनी मला बोलावून सर्व पोलिसांचे आभार मानले. तसेच हस्तांदोलन करत कौतुकाची थाप दिली.”

तर मी भारतातही निवडणूक लढवू शकतो – बायडेन

जो बायडेन यांचे अनेकदा भारत आणि मुंबई कनेक्शन त्यांनी स्वता अनेक वेळेला बोलून दाखवले आहे. त्यांना मुंबईमधून एका बायडेन नावाच्या गृहस्थाने पत्र लिहिले होते. त्याखाली ‘बायडेन फ्रॉम मुंबई’ असे लिहिले होते. त्यामुळे बायडेन फ्रॉम मुंबई आणि माझे पूर्वज एकच होते. 1848 मध्ये जे इस्ट इंडिया टी कंपनीसाठी काम करत होते. त्यातील कुणीतरी भारतीय महिलेशी लग्न केले आणि भारतातच राहिले. हे जर खरे असेल तर मी सुद्धा भारताचा असल्याचे म्हणत मी भारतातही निवडणूक लढवू शकतो, असे म्हटले होते.

बायडेन उपराष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर 2013 साली प्रथमच भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी 24 जुलै 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये भारतीयांना संबोधित केले होते. बायडेन मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना पत्र लिहिणा-या बायडेन फ्रॉम मुंबई या गृहस्थाला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कौटुंबिक आणि राजकीय कारणांमुळे ते शक्य झाले नसल्याची खंत देखील ते व्यक्त करतात. बायडेन जेंव्हा जेंव्हा भारतीय नेत्यांची, नागरिकांची भेट घेतात. तेंव्हा तेंव्हा ते बायडेन फ्रॉम मुंबईचा उल्लेख करतात.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.