Pimpri Chinchwad crime News : पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तीन अवैध धंद्यांवर छापा

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीकाठी सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर चाकण पोलिसांनी छापा मारला. तसेच ओटास्कीम येथे कल्याण मटका आणि पत्त्यांचा जुगार अड्डा चालवणा-या एकावर निगडी पोलिसांनी कारवाई केली. तर तिस-या घटनेत शिरगाव पोलिसांनी दारू विक्री करणा-या व्यक्तीकडून 10 लिटर दारू जप्त केली. अवैध धंद्यांच्या विरोधात पोलिसांची मोहीम जोरात सुरु असून दररोज धाडी टाकून अवैध धंद्यांना चाप लावण्याचे काम पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुरु आहे.

चाकण पोलिसांनी मोई गावात इंद्रायणी नदीकाठी सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर छापा टाकला. त्यात दारू बनविण्याचे एक हजार लिटर रसायन आणि अन्य साहित्य पोलिसांनी नष्ट केले. ही कारवाई मंगळवारी (दि. 15) दुपारी दीड वाजता केली.

गणपत जयसिंग राठोड (वय 50, रा. फलके वस्ती, मोई, ता. चाकण) याच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राठोड याने मोई गावात इंद्रायणी नदीच्या काठावर दारूभट्टी लावली होती. त्याबाबत चाकण पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी दारूभट्टीवर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी गणपत राठोड इंद्रायणी नदीत उडी मारून चिखलीच्या बाजूला पळून गेला.

पोलिसांनी दारू बनविण्याचे एक हजार लिटर कच्चे रसायन आणि अन्य साहित्य नष्ट केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

ओटास्कीम येथे कल्याण मटका आणि पत्त्यांचा जुगार अड्डा चालवणा-या एकावर निगडी पोलिसांनी कारवाई केली. जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी ही कारवाई केली.

आण्णा मारुती धोत्रे (वय 48, रा. ओटास्कीम, निगडी) असे जुगार अड्डा चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक शंकर भागुजी बांगर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

आरोपी आण्णा धोत्रे हा ओटास्कीम येथे कल्याण मटका आणि पत्त्यांचा जुगार अड्डा चालवत होता. निगडी पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी जुगार अड्ड्यावर बुधवारी (दि. 16) छापा मारला. त्यात पोलिसांनी जुगार अड्डा चालक धोत्रे याच्यावर कारवाई केली.

जुगार अड्ड्यावर कारवाई करताना काही नागरिक तिथे जुगार खेळत होते. पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण पळून गेले.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

दारुंब्रे गावात दारू विक्री करत असलेल्या एका व्यक्तीकडून शिरगाव पोलिसांनी एक हजार रुपयांची 10 लिटर दारू जप्त केली. प्रदीप दौलतराव शिनगारे (वय 32, रा. शिरगाव, ता. मावळ) असे दारू विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.