Pimpri Chinchwad Crime News : शहरात विनयभंगाचे तीन गुन्हे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात महिला अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मंगळवारी (दि. 8) शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये विनयभंगाचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

विनयभंगाच्या पहिल्या गुन्ह्यात संजय राजू पातारे (वय 20, रा. स्मशानभूमीजवळ, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत संबंधित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 8 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पीडित तरुणी पिंपळे गुरव परिसरात एक पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिथे जाऊन माझ्याशी बोलत का नाही, असे म्हणत तिच्याशी हुज्जत घातली.

त्यावेळी तरुणीला फोन आला असता आरोपी पातारे याने तिच्या खिशात हात घालून फोन काढून घेतला. तसेच तिचा विनयभंगही केला. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.

अन्य एका प्रकरणात शुभम दिलीप चौधरी (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्या विरोधातही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत आरोपी तरुणाने फिर्यादी पीडित तरुणीचा वेळोवेळी पाठलाग केला. तसेच तिच्याकडे एकटक पाहत तिचा विनयभंगही केला. पोलीस उपनिरीक्षक गिरनार याबाबत अधिक तपास करीत आहेत.

आणखी एका विनयभंगाच्या गुन्ह्यात दीपक सुरेश जाधव (वय 21, रा. मोहननगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत फिर्यादी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

5 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोपी जाधव हा पीडित महिलेच्या घरात घुसला. ‘माझे तुझ्यावर गेल्या पाच वर्षापासून प्रेम आहे. तुझ्या नवऱ्याचे बाहेर लफडे आहे. तो तुला सारखा मारत असतो’, असे म्हणत तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस उपनिरीक्षक वाघमारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.