Chinchwad : पिंपरी-चिंचवड सायबर सेलने आठ महिन्यात 56 जणांचे 27 लाख रुपये केले परत

एमपीसी न्यूज – लॉटरी, रिवॉर्ड पॉईंट, गिफ्ट लागल्याचे अमिश दाखवून ऑनलाईन फसवणूक करून तसेच चुकून एका खात्यातून दुस-या खात्यात पैसे जाण्याचे प्रकार शहरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशा घटनांमध्ये नागरिकांना आधार देत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलने मागील आठ महिन्यात 56 तक्रारदारांचे 27 लाख 16 हजार 643 रुपये परत मिळवून दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी सुरु झाले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2018 रोजी आयुक्तालयांतर्गत सायबर सेल निर्माण करण्यात आले. त्यानंतर सायबर सेलकडे ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारींचा ओघ वाढू लागला. गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून नागरिकांची फसवणूक करतात. पैशांच्या आणि अन्य बाबींच्या अमिषाला बळी पडून नागरिक गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. यातच त्यांची हजारो, लाखो रुपयांची फसवणूक केली जाते.

बँक अधिकारी बोलत आहे. तुमच्या खात्याची माहिती हवी आहे, असे सांगत आरोपी बँक खात्याची संपूर्ण माहिती घेतो आणि त्याद्वारे फसवणूक करतो. लॉटरी लागली आहे. त्या लॉटरीचे पैसे मिळण्यासाठी सुरुवातीला विविध प्रकारच्या टॅक्ससाठी रक्कम भरावी लागणार असल्याचे सांगून पैसे उकळले जातात. मोठ्या रकमेच्या लालसेपोटी नागरिकही पैसे पाठवतात. रिवॉर्ड पॉईंट मिळाले, गिफ्ट लागले असे सांगून ओटीपी शेअर करण्यास सांगतात. ओटीपी शेअर करताच नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे काढल्याचे मेसेज येतात. पैसे गेल्यानंतर नागरिकांच्या चूक लक्षात येते.

कर्ज देण्याच्या बहाण्याने, नोकरी देण्याच्या बहाण्याने फोन करतात. तसेच नोकरीसाठी, ट्रॅव्हल कंपनी, विमा कंपनीची बनावट वेबसाईट बनवून देखील नागरिकांना फसवणुकीच्या मायाजालात अडकवले जाते. गुन्हेगार वेगवेगळ्या पेमेंट गेटवेचा वापर करण्यास सांगून त्याद्वारे आर्थिक फसवणूक करतात.

मागील आठ महिन्यात पिंपरी-चिंचवड सायबर सेलने 56 नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा केला आहे. कौशल्यपूर्ण तपास करून नागरिकांच्या खात्यावरून गुन्हेगाराच्या खात्यावर पैसे गेल्याचे शोधले. संबंधीत मर्चंट व पेमेंट गेटवे शोधून त्याच्यासोबत कायदेशीर पत्रव्यवहार केला आणि या नागरिकांचे 27 लाख 16 हजार 643 रुपये परत मिळवून दिले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखडे, अतुल लोखंडे, भास्कर भारती, प्रदीप गायकवाड, पोपट हुलगे, मनोज राठोड, नितेश बिच्चेवार, युवराज माने, कौंतेय खराडे, नाजुका हुलवळे, आशा सानप, वैशाली बर्गे, स्वप्नाली जेधे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.