Pimpri: स्मार्ट सिटीत ‘स्मार्ट एरिया’चाच केला जातोय विकास!

स्मार्ट सिटीत स्मार्ट भ्रष्टाचार - भाग 3

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात मूळ हेतूलाच हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट एरियाच विकसित केला जात आहे. एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत केवळ पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर या भागाचा विकास केला जात आहे. त्यातही महापालिकेच्याच कामांना मुलामा देऊन स्मार्ट सिटीअंतर्गत केल्याचे दाखविले जाते. पिंपरी, भोसरी मतदारसंघात एकही काम केले जात नाही. केवळ एका एरियाचा विकास म्हणजे  स्मार्ट सिटी होते का, असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. स्मार्ट सिटीच्या स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यांनी या कामांना हारकत घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्प 1150 कोटीचा आहे. या पैशांचा योग्य पद्धतीने विनियोग होणे आवश्यक असताना एरिया बेस डेव्हलपमेंटअंतर्गत पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर या विकसित भागाचाच विकास केला जात आहे. या भागासाठी तब्बल 593 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे क्षेत्रफळ केवळ साडेचार चौरस किलोमीटर आहे. उर्वरित भागासाठी केवळ 535 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुळातच हा भाग शहरातील सर्वांत विकसित, सर्व सोयी-सुविधा युक्त असलेला आहे. हा भाग स्मार्ट सिटीत कसा निवडला हा संशोधनाचा विषय आहे?. या स्मार्ट भागाचांच विकास करणे कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पिंपरी, भोसरी मतदारसंघात स्मार्ट सिटीअंतर्गत एकही काम केले जात नसल्याचे दिसून येते.

सुनियोजित भागात स्मार्ट सिटीचा पैसा खर्च करणे योग्य नाही.  शहराचा समान विकास होणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेली कामे स्मार्ट सिटीअंतर्गत होताना दिसून येत नाहीत. नागरिकांना समोर ठेऊन कामे केली जात नाहीत.  स्मार्ट सिटीअंतर्गत केवळ शो-बाजी केली जात असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या कामानांच फिनिशिंग करुन स्मार्ट सिटीची कामे असल्याचे नागरिकांना भासविले जात असल्याचा आरोप होत आहे. केवळ कागदावर स्मार्ट सिटी दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र काम शुन्य आहे.  स्मार्ट सिटीअंतर्गत कॉपी पेस्टचे प्रकल्प नकोत, शहरवासीयांना आवश्यक असे प्रकल्प राबविणे आवश्यक आहे.

याबाबत बोलताना स्मार्ट सिटी अॅडव्हायजरी फोरमचे सदस्य तुषार शिंदे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे. स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट एरियाच विकसित केला जात आहे. शहाराचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित असताना अगोदरच विकसित असलेल्या पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर भागात स्मार्ट सिटीत काम केले जात आहे. शहरात सर्वांत सुंदर हा भाग आहे. तरी देखील साडेअकराशे पैकी साडेपाचशे कोटी त्याच भागात खर्च केले जाणार आहेत. हा केवळ तीन टक्के भुभाग असून त्यावर 52 टक्के पैसे खर्च केले जात आहेत. तर, उर्वरित 97 टक्के भागावर केवळ 48 टक्के पैसे खर्च केले जात आहेत हा कोणता न्याय आहे”.

”महापालिकेच्या कामावर रंगरंगोटी करुन स्मार्ट सिटीअंतर्गत झाल्याचे भासविले जात आहे. ज्या ठिकाणी विकासाची आवश्यकता आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात असून हे अत्यंत चुकीचे आहे. याबाबत लोकप्रतिनिधींकडून देखील आवाज उठविला जात नाही. अन्याय होत असूनही विरोधी पक्ष शांत आहे याचे आश्चर्य वाटते. पिंपरी, भोसरी विधानसभा मतदारसंघात स्मार्ट सिटीअंतर्गत कोणतेही काम केले जात नाही. त्यावर लोकप्रतिनिधींनी देखील आवाज उठवणे आवश्यक आहे”, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.