Chinchwad : पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसर अडचणींच्या गर्तेत

Pimpri Chinchwad industrial complex in a pit of difficulties.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात अनेक अडचणी आवासून उभ्या आहेत. लघु उद्योजक दररोज विविध अडचणींचा सामना करीत आहेत. त्यात भरीस भर म्हणून परिसरात गुन्हेगारी घटना देखील वाढत आहेत. त्यावर उपाय काढण्यासाठी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील विविध संघटना, सामाजिक संस्था यांच्या बरोबर ‘विधीसंघर्शीत बालकांचे पुनर्वसन’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र झाले.

या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त पोलीस हिरेमठ, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना अध्यक्ष संदीप बेलसरे आदी उपस्थित होते.

चर्चासत्रात पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेकडून अल्पवयीन बालकांसाठी जे सहकार्य करता येईल ते करण्याचे आश्वासन देत संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी पोलीस आयुक्तांना पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील विविध अडचणींचे निवेदन दिले.

संघटनेकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेमार्फत बाल गुन्हेगारांना योग्यप्रकारे समुपदेशन व मार्गदर्शन करून जे बालगुन्हेगार अज्ञान नसतील त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा तसेच जे सज्ञान असतील त्यांच्यासाठी रोजगार मेळावे घेऊन त्यांना त्यांच्या कुवती प्रमाणे काम देऊन सतत कामात गुंतवून ठेऊन समाज प्रवाहात जास्तीत जास्त कसे आणता येईल यासाठी संघटनेमार्फत सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल.

पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील तळवडे, सोनवणेवस्ती, कुदळवाडी, चिखली, शांतीनगर, प्राधिकरण सेक्टर 7 व 10 तसेच एम.आय.डी.सी. भोसरी, पिंपरी, चिंचवड या औद्योगिक परिसरात चो-यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरटे गटागटाने येऊन सुरक्षा रक्षकाला प्राणघातक हत्याराचा धाक दाखवून चोरी करतात. सुरक्षा रक्षक निशस्त्र असल्यामुळे प्रतिकार करू शकत नाहीत.

पोलीस उद्योजकांनाच सी.सी.टी.व्ही. बसवा, सुरक्षारक्षक ठेवा असा सल्ला देतात. वरील औद्योगिक परिसरातील बहुतांश उद्योजकांनी आपापल्या कंपनीमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविलेले असून सुरक्षारक्षक देखील ठेवलेले आहेत.

परंतु ज्या कंपन्यांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत त्या कंपन्यांनी संबधित पोलीस स्टेशनला सी.सी.टी.व्ही. फुटेज देऊन देखील अद्याप चोरांचा किवा चोरी झालेल्या मालाचा पोलिसांना तपास लागलेला नाही.

पोलीस दप्तरी औद्योगिक परिसरात चो-या करणाऱ्या ज्या अट्टल गुन्हेगाराची नोंद आहे, त्यांच्यावर कायमस्वरूपी कडक प्रतिबंधात्मक कारवाई व्हायला हवी. औद्योगिक परिसरात महिला कामगार वर्ग देखील कामाला आहे.

या चोरांकडून महिला वर्गाची छेडछाड केली जाते. त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्याची चोरी केली जाते. या चोरट्यांमुळे महिला कामगारांना कंपनी व्यवस्थापन ओव्हर टाईमला थांबवू शकत नाही. महिला देखील ज्यादा वेळ कामावर थांबत नाही.

तसेच पुरुष कामगारांना अडवून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल काढून घेतले जातात. त्यांना मारहाण केली जाते. त्यामुळे कामगारांच्या कामावर येण्याच्या व घरी जाण्याच्या वेळेत पोलीस पथकांनी गस्त घालण्याची व्यवस्था करायला हवी.

पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात स्वयंघोषित अनधिकृत माथाडी कामगार संघटना आहेत. त्या त्यांचे कामगार कामावर ठेवण्यासाठी व प्रोटेक्शन मनी देण्यासाठी उद्योजकांना नाहक त्रास देत असतात. कंपनीमध्ये चोरी व इतर त्रास होईल या भीतीने उद्योजक तक्रार करण्यास पुढे येत नाही.

सध्या कोविड 19 साथ सुरू असल्याने गेले मार्च 2020 पासून औद्योगिक परिसर कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे 55 दिवस बंद होता. त्यामुळे उद्योजक हा फार मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.

कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे औद्योगिक परिसरातील जवळपास सर्वच कामगार हे आपापल्या गावी निघून गेल्यामुळे उद्योग चालविणे फार जिकरीचे झाले आहे. त्यातच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, ऑक्सिजन वायूचा होणारा अपुरा पुरवठा व वाढलेले दर यामुळे उद्योजक मेटाकुटीस आला असून त्यातच येणा-या दिवाळी सणात कामगारांना द्यावा लागणारा पगार व बोनस यामुळे उद्योजकाची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक आहे.

दरम्यान दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून उद्योजकांना सहकार्य करावे. सन 2013 मध्ये पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने प्रायोगिक तत्वावर गस्ती पथक योजना राबवली होती. त्यावेळेस चो-यांचे प्रमाण देखील कमी झाले होते.

परंतु आर्थिक कारणांमुळे ती योजना बंद करावी लागली. तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योजकांना अशी योजना राबविणे शक्य होणार नसल्याने हीच योजना पोलिसांमार्फत राबवावी.

संघटनेच्या अन्य अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात अपर आयुक्तांसोबत बैठक होणार असल्याचे बेलसरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.