Pimpri: ‘दत्ता साने यांच्या मृत्यूप्रकरणी बिर्ला हॉस्पिटलची चौकशी करा’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pimpri-chinchwad: Inquire into Birla Hospital over Datta Sane's death, demands Santosh Walke to CM दत्ता सानेंनी गेल्या दोन महिन्यांत महापालिकेमधील पीपीई किट, साबण, मास्क, सॅनिटायझरमधील भ्रष्टाचार उघडकीस आणला.

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने यांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू संशयास्पद आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांची कोरोनाची तपासणी कोठे आणि कोणत्या लॅबमध्ये केली. चिंचवडमधील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून आणि मृत्यू होईपर्यंत दिलेल्या उपचाराची, हिस्ट्री रिपोर्टची तपासणी करावी. ‘सीसीटीव्ही’ फुटेजची चौकशी करावी, अशी मागणी दिघीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष वाळके यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना वाळके यांनी निवेदन पाठविले आहे. त्यात वाळके यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने यांचे कोरोनामुळे आदित्य बिर्ला रुग्णालयात निधन झाले. मृत्यू झाल्याची घटना पाहता दत्ताकाका 3 तारखेला पत्रकार तसेच इतर लोकांशी मोबाईलवर संपर्क साधून बोलत होते. त्यांची प्रकृती ठीक होती, हे ते आवर्जून सांगत होते.

मग अचानक रात्री एक ते तीन दरम्यान हार्टअटॅक कसा, हे अजूनही लोकांना न पचणारा विषय झाला आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. गेल्या दोन महिन्यांत महापालिकेमधील पीपीई किट, साबण, मास्क, सॅनिटायझरमधील भ्रष्टाचार उघडकीस आणला.

शहरातील बडे नेते त्यांच्यावर राग द्वेष धरून होते, अशी बरेच प्रकरणे त्यांनी शेवटच्या टप्प्यावर आणली होती.

त्यात कोरोना लागण झाली. दत्ताकाका यांची कोव्हिडची तपासणी कोठे आणि कोणत्या लॅबमध्ये केली. चिंचवडमधील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून आणि मृत्यू होईपर्यंत दिलेल्या उपचाराची, हिस्ट्री रिपोर्टची तपासणी करावी. ‘सीसीटीव्ही’ फुटेजची चौकशी करावी. दत्ताकाकांना योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे.

अलीकडे भ्रष्टाचार वाढला आहे आणि तो काढणारा अशा लोकांसाठी शत्रू बनत चालला आहे. त्यामुळे माणसे कोणत्या थराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून शहरात चाललेल्या चर्चेवरून दत्ताकाकांच्या निधनाची चौकशी झाली पाहिजे. आदित्य बिर्ला हॉस्पिटलची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी वाळके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.