Pimpri: विधानपरिषदेची लॉटरी काँग्रेस की राष्ट्रवादीला?, दोनही शहराध्यक्षांची नावे चर्चेत

Pimpri-chinchwad: Legislative Council Lottery to Congress or NCP, The names of both party city president sachin sathe and sanjog waghere are under discussion शहराध्यक्षालाच आमदारकी द्यावी असाही सूर आहे. राष्ट्रवादीचा शहरात आमदार आहे. काँग्रेसचे स्थान शहरात नगण्य आहे.

एमपीसी न्यूज (गणेश यादव)- राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागा पिंपरी-चिंचवड शहराला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शहरासाठी एक जागा देणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शहराध्यक्षालाच आमदारकी द्यावी असा सूर आहे. त्यात काँग्रेस आघाडीवर असून काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे या दोघांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षापैकी कोणता पक्ष जागा सोडतो आणि कोणत्या शहराध्यक्षाला संधी मिळते. अथवा दरवेळीप्रमाणे यावेळीही शहराची निराशा होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. महाविकासआघाडीत शिवसेना चार, राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि काँग्रेस चार जागा असा फॉर्म्युला असू शकतो.

त्यानुसार मंत्रिमंडळाकडून नावांची शिफारस आठवड्याभरात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक दीड वर्षावर आली आहे. त्यादृष्टीने दोनही काँग्रेसने नियोजन सुरु केले आहे.

शहराध्यक्षालाच आमदारकी द्यावी असाही सूर आहे. राष्ट्रवादीचा शहरात आमदार आहे. काँग्रेसचे स्थान शहरात नगण्य आहे. त्यामुळे काँग्रेसच एक जागा सोडेल अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसनंतर राष्ट्रवादीने महापालिकेवर कब्जा केला. त्यानंतर आता भाजप सत्तेत आहे. काँग्रेसने नेहमीच शहराकडे दुर्लक्ष केले. परिणामी, शहरात काँग्रेस शून्यावर गेली. महापालिकेत एकही नगरसेवक नाही.

अशा पडत्या काळातही साठे यांनी शहरात काँग्रेस जगविली. रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. लोकसभा-विधानसभेला आघाडीचा धर्म निभावला. साठे निष्ठावान आहेत. त्यांना पक्षाची ध्येय-धोरणे माहीत असून वक्तृत्व चांगले आहे. हायकमांडशी संबध, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साठे यांना विधानपरिषदेवर घेऊन ताकद दिली जाणार असल्याची चर्चा शहर काँग्रेसच्या वर्तुळात आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले पार्थ पवार यांचे साठे यांनी प्रामाणिकपणे काम केले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी देखील एक जागा सोडेल या आशेवर शहराध्यक्ष आहेत. पण जागा सोडण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे इच्छुक आहेत. पण, त्यांच्या कार्यकाळात पालिकेतील सत्ता गेली.

पाच वर्षांपासून शहराध्यक्ष असूनही म्हणावी तशी त्यांना छाप पाडता आली नाही. केवळ लोकसभेला तीव्र इच्छुक असूनही पार्थ पवार यांच्यासाठी माघार घेतली हीच त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.

शहरात राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्यामुळे जागा सुटण्याची शक्यता कमी आहे. पण, शहरातील राष्ट्रवादीचे सर्व निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री अजितदादा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘कोण’ होवू शकतो राज्यपाल नियुक्त आमदार!
कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात.

तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. पण, राजकीय पक्ष पराभूत नेते, नाराजांचीच विधानपरिषदेवर नियुक्ती करतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे.

सरकारने शिफारस केलेली नावे राज्यपाल स्वीकारणार का?

महाराष्ट्र विधानपरिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.