Pimpri: लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना सहकार्य करा, बिलांची दुरुस्ती करून द्या- अण्णा बनसोडे

pimpri-chinchwad: Mla Anna Bansode Appeals to MSEB for Assist consumers and gives instruction to rectifiy the bills सरासरी वीज वापरापेक्षा एकत्रित रीडिंग घेतल्याने वीज दराबाबत लागू असलेल्या स्लॅबनुसार बिलाची आकारणी केली जाणार आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे गेली तीन महिने वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग नोंदवून घेणे महावितरणने बंद ठेवले होते. कोरोनाचा प्रादूर्भाव थोपविण्यासाठी सुमारे तीन महिने ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेतले गेले नव्हते. लॉकडाऊन शिथिल होताच महावितरण कंपनीने वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग घेणे सुरु केले असून तीन महिन्यांचे एकत्रितपणे वीज बिल ग्राहकांना येणार आहे. सरासरी वीज वापरापेक्षा एकत्रित रीडिंग घेतल्याने वीज दराबाबत लागू असलेल्या स्लॅबनुसार बिलाची आकारणी केली जाणार आहे. सामान्य मीटर रीडिंग मधील दोष तात्काळ निवारण करावेत. योग्य वीज देयेके ग्राहकांना दुरुस्त करून द्यावीत आणि ही बिले भरण्यासाठी हप्ते बांधून द्यावेत, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

100 युनिट पर्यंत 3.76 रुपये 101 ते 300 पर्यंत 7.43 रुपये व 301 ते 500 युनिटसाठी 10.32 रुपये तर 501 युनिटच्या पुढे 11.71 रुपये प्रती युनिट असे दर असून 1 एप्रिलपासून महापालिका क्षेत्रासाठी 10 अतिरिक्त स्थिर आकार लागू करण्यात आलेला आहे.

याच युनिट वापरावर वहन आकार व वीज शुल्क आकारणी अवलंबून आहे. त्या अनुषंगाने एखाद्या ग्राहकाचा दरमहा वीज वापर 100 युनिट असेल. तर त्या ग्राहकाचा वापर एकत्रित बिलामुळे 300 युनिट दिसणार आहे.

त्याच्या वीज बिलात एकत्रित 3 महिन्याचे रीडिंग घेतल्याने युनिट दर आकारणीत फरक येणार आहे. अशा परिस्थितीत त्या ग्राहकाला नाहक भुर्दंड बसणार आहे. हा भुर्दंड सामान्य घरगुती वीज ग्राहकास बसू नये यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी महावितरणच्या गणेश खिंड परिमंडळाचे अधिक्षक अभियंता पंकज तगडपल्लेवार व पिंपरी डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांच्यासमवेत बैठक घेऊन सूचना दिल्या.

सामान्य मीटर रीडिंगमधील दोष तात्काळ निवारण करून योग्य वीज देयेके ग्राहकांना दुरुस्त करून द्यावीत. ही बिले भरण्यासाठी हप्ते बांधून द्यावेत. तसेच कोरोनाच्या महामारीच्या काळात घरघुती वीज ग्राहकांना सहकार्य करा अशाही सूचना केली.

शहरात वीज पुरवठा सुरळीतपणे राहावा याबाबत आवश्यक काळजी घ्यावी. पावसाळा सुरु होत असल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढणार असल्याने याबाबत कोणते नियोजन करण्यात आले आहे, याचाही आढावा बनसोडे यांनी घेतला.

वीज बिलामध्ये दोष असल्यास ग्राहकाने आमच्या जवळच्या कार्यालयातून वीज देयक दुरुस्त करून घ्यावे, असे सांगितले.

तसेच शहरातील वीज पुरवठयासाठी आवश्यक साधनसामुग्री व भूमीत वीज वाहिन्या टाकण्यासाठी लागणारा निधी याचा एकत्रित विकास आराखडा करण्याच्या सूचना बनसोडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून शहरातील कामासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून आणण्यासाठी कमी पडणार नसल्याचे सांगितले.

पावसाळ्यातील आवश्यक कामे महावितरणने केली आहेत. ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीतपणे ठेवण्यासाठी कोरोनाच्या काळातही आम्ही कार्यरत असून नागरिकांनी काळजी घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अधिक्षक अभियंता तगडपल्लेवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.