Pimpri : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अडचणीत वाढ; आयुक्तांच्या कार्यालयातील आऊटगोइंग बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मनुष्यबळ, संसाधने, इमारत यांसारख्या मूलभूत गोष्टींची कमतरता असून या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आज (गुरुवारी) पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील लँडलाईनचे आऊटगोइंग पैसे न भरल्यामुळे बंद झाले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या कार्यालयात 020 27450555 हा लँडलाईन क्रमांक कार्यान्वित आहे. 15 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ऑटो क्लस्टरच्या इमारतीमधून कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर आयुक्तालय कार्यालयात पेन, पेन्सिल, कागद यापासून सर्व गोष्टी आणण्यात आल्या. त्याचबरोबर लँडलाईन कनेक्शन देखील घेण्यात आले. लँडलाईन कनेक्शन आले, काम सुरू झाले. बघता बघता महिना संपला, पण महिन्याभराचा कालावधी उलटून गेला तरी फोनबील मात्र भरले नाही. त्यामुळे टेलिफोन कंपनीने पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील लँडलाईनचे चक्क आऊटगोइंगच बंद केले. टेलिफोन बिलाची ही रक्कम सुमारे दोन हजार आहे.

नुकतेच पोलीस आयुक्तालयातील पंधराव्या पोलीस ठाण्याचे (चिखली) उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी शहरातील मातब्बर नेतेमंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती. कार्यक्रमात सर्वांनी पोलीस आयुक्तालयाला लागेल त्या गोष्टी पुरविण्याच्या फैरी झाडल्या. पण या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने आता आयुक्तालयाच्या मदतीला कोण आणि कसं धावून येणार, हे पाहणे अतिशय उत्सुकतेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.