Pimpri : निर्बिजीकरण केलेल्या श्वानाचे छायाचित्र काढा; स्थायी समितीचा आदेश 

वर्षभरात 14 हजार श्वानाचे केले निर्बिजीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे निर्बिजीकरण केलेल्या भटक्या श्वानाचे छायाचित्र काढून ठेवण्यात यावे. निर्बिजीकरण केलेला श्वान ओळखू यावा यासाठी त्यावर निशानी करावी. त्याची नोंद ठेवण्यात यावी, असे आदेश स्थायी समितीने पशुवैद्यकीय विभागाला दिला आहे. गेल्या वर्षभरात 14 हजार श्वानाचे निर्बिजीकरण केल्याचा दावा, पशुवैद्यकीय विभागाने केला आहे. तसेच आगामी तीन महिन्यात साडेतीन हजार श्वानाचे निर्बिजीकरण केला जाणार आहे. दरम्यान, शहरात एवढे श्वान आले कोठून असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (गुरुवारी)पार पडली. स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेतर्फे लातुर येथील मेसर्स सोसायटी फॉर दि प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल आणि नवी मुंबईतील अॅनीमल वेल्फअर असोसिएशन यांना शहरातील श्वानाचे निर्बिजीकरण करण्याचे काम देण्यात आले होते. त्या कामाची मुदत संपली होती. त्याला स्थायी समितीने तीन महिने मुदतवाढ दिली आहे. त्यासाठी 24 लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. या संस्थेमार्फत पुढील तीन महिन्यात तीन हजार 600 श्वानाचे निर्बिजीकरण केले जाणार आहे. महिन्याला 1200 श्वानाचे निर्बिजीकरण करण्यात येणार आहे.

शहरातील वाढत्या भटक्या श्वानाबाबत स्थायी समितीत चर्चा झाली. सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, शहरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. श्वानाचे निर्बिजीकरण केले जात असल्याचे सांगितले जाते. परंतु, संख्या कमी होत नाही. न्यायालयाचा आदेश असल्याने भटक्या श्वानाला मारता येत नाही. ज्या जागेवरुन श्वानाला उचलले आहे. त्याच जागेवर शस्त्रक्रिया केल्यानंतर सोडावे लागत आहे. गेल्या वर्षभरात 14 हजार श्वानाचे निर्बिजीकरण केल्याचे सांगितले जात आहे.

परंतु, श्वानाची संख्या कमी होत नाही. त्यामुळे किती श्वानाचे निर्बिजीकरण केले. त्याची सविस्तर माहिती देण्याचा आदेश दिला आहे. तसेच निर्बिजीकरण केलेल्या भटक्या श्वानाचे छायाचित्र काढून ठेवण्यात यावे. निर्बिजीकरण केलेला श्वान ओळखू यावा यासाठी त्यावर निशानी करावी. त्याची नोंद ठेवण्यात यावी, असे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सदस्या गीता मंचरकर म्हणाल्या, आपल्या प्रभागातील भटक्या श्वानाला निर्बिजीकरकणासाठी पशुवैद्यकीय विभागाने नेले होते. त्यांना सोडून दिल्यानंतर पिल्ली झाली. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाकडून भटक्या श्वानाचे निर्बिजीकरण केले जात नसल्याचे, स्पष्ट होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.