Pimpri News: कचरा विलगीकरण, जनजागृतीवर 19 कोटींचा खर्च; स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा विलगीकरण, ओला आणि सुका कचरा वेगळा करुन देण्याबाबत घरोघरी जनजागृती करण्यासाठी महापालिकेने आठ संस्थाची नियुक्ती केली आहे. एक वर्षासाठी या संस्थांची नियुक्ती केली. एका घरी जनजागृती करण्यासाठी संस्थेला 23 रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी येणा-या 19 कोटी 20 लाख 75 हजार रुपयांच्या आयुक्तांनी मांडलेल्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बिनभोबाट मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छाग्रह_स्वच्छतेकडून_समृद्धीकडे..’, ‘आपल्या प्रत्येकाची जबाबदारी, स्वच्छतेची घेऊया खबरदारी’, ‘चला निश्चय करूया, पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर बनवुया’ अशा घोषवाक्याने 39 व्या वर्धापन दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात स्वच्छ व सुंदर कचरामुक्त शहर करण्याचा आरोग्यासोबत पर्यावरण विषयी महत्वपुर्ण संकल्प केला.

या महत्त्वपूर्ण संकल्पासोबतच स्वच्छाग्रह या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. महापालिकेकडून दररोज कचरा संकलन करुन मोशी डेपोत नेला जातो. शहरात दिवसाला 1200 टन कचरा गोळा होतो. नागरिक ओला आणि सुका कचरा वेगळा देत नाहीत. त्यामुळे ओल्या कच-याचे खत तयार करता येत नसल्याचे महापालिकेचा दावा आहे. त्यासाठी नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करुन देण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयानिहाय संस्थांची नियुक्ती केली आहे. ‘अ’ प्रभाग कार्यालय हद्दीतीतील कचरा अलगीकरण जनजागृतीसाठी बेसिक्स म्युनिसिपल बेस्ट व्हेचर्स यांची नियुक्ती केली. एका घरी जनजागृतीसाठी 23 रुपये दिले जाणार आहेत. प्रभागात 89 हजार 8 घरे, आस्थापना आहेत. त्यांना एकूण 2 कोटी 45 लाख 66 हजार 208 रुपये दिले जाणार आहे.

‘ब’ प्रभाग कार्यालयासाठी ऑल इंडिया इंस्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांची नियुक्ती केली. प्रभागात 87 हजार 887 घरे आहेत. एका घरासाठी 23 रुपये असे 2 कोटी 42 लाख 56 हजार 812 रुपये दिले जाणार आहेत.

‘क’ प्रभाग कार्यालयासाठी डीवाईन मॅनेजमेंट अॅण्ड सर्विसेस या संस्थेची नियुक्ती केली. प्रभागात 84 हजार 275 घरे आहेत. एका घरासाठी 23 रुपये असे 2 कोटी 32 लाख 59 हजार 900 रुपये संस्थेला दिले जाणार आहेत.

‘ड’ प्रभाग कार्यालयासाठी बेसिक्स म्युनिसिपल बेस्ट व्हेचर्स यांची नियुक्ती केली. प्रभागात 99 हजार 866 घरे आहेत. एका घरी जनजागृतीसाठी 22 रुपये या प्रमाणे 2 कोटी 63 लाख 76 हजार 608 रुपये संस्थेला दिले जाणार आहे.

‘इ’ प्रभागासाठी बेसिक्स म्युनिसिपल बेस्ट व्हेचर्स यांची नियुक्ती केली. प्रभागात 78 हजार 305 घरे असून एका घरी जनजागृतीसाठी 23 रुपयांप्रमाणे 2 कोटी 16 लाख 12 हजार 810 रुपये संस्थेला दिले जाणार आहेत.

‘फ’ प्रभागासाठी जनवानी या संस्थेची नियुक्ती केली. प्रभागात 1 लाख 4 हजार 611 घरे असून एका घरासाठी 22 रुपयांप्रमाणे 2 कोटी 76 लाख 17 हजार 304 रुपये संस्थेला दिले जाणार आहेत.

तर, ‘ग’ प्रभागासाठी डीवाईन मॅनेजमेंट अॅण्ड सर्विसेस या संस्थेची नियुक्ती केली. प्रभागात 83 हजार 352 घरे असून एका घरासाठी 23 रुपये याप्रमाणे 2 कोटी 29 लाख 97 हजार 700 रुपये संस्थेला दिले जाणार आहेत.

आठ प्रभागात ओला आणि सुका कचरा वेगळा करुन देण्याबाबत जनजागृती करण्यासाठी या संस्थांची एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी 19 कोटी 20 लाख 75 हजार 216 रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.