Pimpri: आयुक्त हर्डीकर यांच्या कारभारावर अजितदादा गरजले!

एमपीसी न्यूज – यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी असताना सध्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर चांगले काम करत होते. त्यामुळे महापालिकेत देखील ते चांगले काम करतील अशी अपेक्षा होती. परंतु, पालिकेत ते चुकीच्या पद्धतीने कामकाज करत आहेत. विरोधी पक्षाच्या नगरसवेकांची कामे केली जात नाही. विरोधकांना मानसन्मान दिला जात नाही. प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांच्याकडून पक्षपातीपणा केला जात आहे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त हर्डीकर यांच्यावर निशाना साधला. तसेच आम्ही सत्तेत असताना विरोधकांसोबत कधीच दुजाभाव केला नाही, असेही ते म्हणाले. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज (सोमवारी) पक्षाच्या पदाधिका-यांसोबत आढावा बैठक घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते.  दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्त हर्डीकर यांच्या तक्रारींचा पाडा पवार यांच्याकडे वाचला. आयुक्त भाजपचे प्रवक्ते, घरगडी असल्यासारखे कामकाज करतात. राष्ट्रवादीच्या नगरसवेकांची कामे अडवितात. दुजाभाव करतात, अशी गा-हाणी सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी आयुक्त हर्डीकर यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढविला.

पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची 20 वर्ष सत्ता होती. आम्ही सत्तेच्या काळात विरोधकांची कामे कधीच अडविली नाहीत. विरोधकांना नेहमीच मानसन्मान दिला. निधीची कमतरता पडू दिली नाही. तसेच अधिकारी देखील कामे अडवित नव्हते. तत्कालीन आयुक्त दिलीप बंड, आशिष शर्मा, डॉ. श्रीकर परदेशी, राजीव जाधव यांनी व्यवस्थित प्रशासन हाताळले. त्यांच्याकडून कधीच विरोधकांचा अवमान झाला नाही.

विरोधकांची कामे करण्याबाबत आयुक्तांना सूचना देत होतो असे सांगत पवार म्हणाले, मी उपमुख्यमंत्री असताना श्रावण  हर्डीकर यवतमाळचे जिल्हाधिकारी होते. चांगले काम करत होते. थेट आयएएस होते. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा होती. परंतु, पिंपरी महापालिकेत आल्यापासून त्यांच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे.

आयुक्तांकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबाबत दुजापणा केला जातो. विरोधक देखील जनतेचे लोकप्रतिनिधी असतात. त्यामुळे भेदभाव करणे चुकीचे आहे. विरोधकांना मानसन्मान दिला जात नाही. निधी कमी दिला जातोय. जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन केल्यास राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले जातात. भाजपच्या राजवटीत आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची नवीन पद्धत सुरु झाली आहे. आयुक्तांनी भेदभाव करणे चुकीचे आहे. त्यांचा प्रशासनावर कसलाच वचक राहिला नाही, असा हल्ला पवार यांनी चढविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.