Pimpri: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उत्पन्न 40 टक्क्यांनी घटणार; अर्थसंकल्पाची पुनर्रचना होणार

Pimpri Chinchwad Municipal Corporation's income will be reduced by 40 percent the budget will be restructured

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मागील दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. बांधकाम परवानगी आणि करवसुली ठप्प आहे. यामुळे 40 टक्के उत्पन्न घटण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. परिणामी, वर्ष 2020-21 या अर्थसंकल्पाची पुनर्रचना केली जाणार आहे. विविध विकासकामांना कात्री लावून अर्थसंकल्पाची मांडणी केली जाणार आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे महापालिकेचे अर्थचक्र बिघडले आहे. पुढील काळात महापालिकेला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. बांधकाम परवानगी आणि मालमत्ताकर हे महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. त्यात सर्वाधिक उत्पन्न बांधकाम परवानगीतून मिळतो. परंतु, बांधकाम परवानगीचे काम थंड आहे. लॉकडाउनमुळे आलेल्या आर्थिक संकटाचा बांधकाम क्षेत्रावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बांधकाम परवानगीतून उत्पन्न कमी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यानंतरचा महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत करसंकलन आहे. परंतु, या विभागाचे काम ठप्पच आहे. करसंकलन कार्यालये बंदच आहेत. राज्य सरकारकडूनही जीएसटीपोटीचे अनुदान कमी मिळत आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक मंदीचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी आता आर्थिक शिस्त लावावी लागणार आहे. अन्यथा भविष्यात मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महापालिकेच्या जमा रक्कमांची स्थिती गंभीर स्वरुपाची राहण्याची शक्यता आहे. पालिकेच्या विविध स्रोतापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील परिणाम होणार आहे. अंदाजपत्रकातील अपेक्षित जमा रक्कमेमध्येही तूट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध निधी काटकसरीने व योग्य त्या आवश्यक बाबींवर खर्च करणे गरजेचे आहे. त्यासाठी उपलब्ध निधीचा काटकसरीने वापर करणे. त्यासाठीच्या उपाययोजना सूचविण्यासाठी महापालिकेने सहा सदस्यीय समितीची नियुक्ती देखील केली आहे. राज्य सरकारनेही चालू आर्थिक वर्षात नवीन बांधकामे करु नयेत असे आदेश दिले आहेत.

महापालिकेचे व्यवहार ठप्प, बजेट घटवणार
”लॉकडाउनमुळे महापालिकेचे संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे महापालिकेच्या स्त्रोतांकडून निधी उपलब्ध होणार नाही. महापालिकेचे उत्पन्न 40 टक्यांनी कमी होईल. त्यामुळे बजेट देखील कमी होईल. परिणामी, वर्ष 2020-21 या अर्थसंकल्पात बऱ्यापैकी दुरुस्ती करावी लागणार आहे. त्याची पुनर्रचना करण्यात येणार आहे. राज्य सरकारने 33 टक्के बजेटची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियोजन केले जात आहे. कोणती कामे बंद करायची आणि कोणती कामे चालू ठेवायची याचा निर्णय 31 मे पर्यंत घेतला जाणार आहे”, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.