Pimpri News: पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘सांगली पॅटर्न’ घडविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा फुसका बार

एमपीसी न्यूज – भाजपचे नगरसेवक फोडून सत्तांतराचा सांगली पॅटर्नपिंपरी-चिंचवड महापालिकेतही घडविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा तूर्त तरी फुसका बारठरली आहे. स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी याबाबत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत सांगली पॅटर्न घडविणार असल्याचा दावा केला होता, तथापि, स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीत सत्तारूढ भाजपचे अॅड. नितीन लांडगे हेच विजयी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.

भाजपचे नाराज 12 ते 15 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य वाघेरे यांनी केले होते. त्यातच भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांना स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी महापौरांकडे स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजीचा फायदा मिळण्याची आशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना वाटत होती. प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या घोषणा या निव्वळ वल्गना ठरल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे नगरसेवक फोडून पिंपरी-चिंचवड महापालिकेतही सत्तांतर घडविण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आखली. त्यानुसार ऑपरेशन ‘सांगली पॅटर्न’ सुरू देखील झाले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी त्याबाबत जाहीर वाच्यता केल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते सावध झाले आणि राष्ट्रवादीचा कावा यशस्वी होण्यापूर्वीच भाजप नेत्यांनी त्यांच्या पद्धतीने ‘डॅमेज कंट्रोल’ केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडून ‘लक्ष्य’ बनविले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे होऊन देऊन देखील शहर नेतृत्वाच्या गाफीलपणामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता गमवावी लागल्याचा आरोप पुन्हा जोर धरू लागला आहे. सत्ता गेल्यानंतर प्रबळ विरोधक म्हणून भाजपवर अंकुश ठेवण्यात वाघेरे अपयशी ठरले. त्यानंतर आता महापालिकेच्या पुढील निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ‘नको त्या वेळी’ पक्षाची रणनीती जाहीर करून वाघेरे अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत करीत असल्याचा आरोप पक्षांतर्गत विरोधकांकडून करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रथम भाजपमध्ये फूट पाडली आणि सांगली महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर ‘सांगली पॅटर्न’चा आपोआप राज्यभर धमका ऐकू गेला. विरोधी पक्षाला गाफील ठेवून अशा प्रकारच्या राजकीय खेळी केल्या जातात, एवढे मुत्सद्दीपण वाघेरे यांनी दाखवायला हवे होते, अशी दबक्या आवाजातील चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात कानावर येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून वाघेरे यांच्या विषयी तक्रार करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षांच्या वक्तव्यांना अजितदादांनी लगाम घालावा अथवा पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सक्षम नेत्याच्या खांद्यावर द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेत, यासाठी अजितदादांना साकडे घालण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यासह काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करणार हे उघड गुपित आहे. त्याच वेळी राज्यातील सत्तेचा फायदा उठवत भाजपची सत्ता उलथवून परत आपला पारंपरिक गड काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यात कोणाची सरशी होणार हे महापालिका निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी शहरात मोठी राजकीय उलथा-पालथ होण्याची शक्यता आहे. कुरघोडीच्या या राजकारणात कोणाची सरशी होणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.