Pimpri: उपमुख्यमंत्री अजित पवार महापालिकेच्या ‘बाथरुमला’ भेट देतात तेव्हा…

pimpri-chinchwad municipal corporation's wrong facebook post on dcm ajit pawar

एमपीसी न्यूज- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.30) पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोरोनाच्या वॉररुमला भेट दिली. मात्र, पालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर इंग्रजी भाषांतरात अजितदादांनी वॉररुमला नव्हे तर ‘बाथरुमला’ भेट दिल्याचे लिहिले आहे. त्यानंतर या पोस्टवर प्रतिक्रियांचा मोठा पाऊस पडला. अनेकांनी या भाषांतरावर तिरकस प्रतिक्रिया दिली. दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा संदेश मराठीतच टाकला होता. त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर कसे झाले याचा तपास करत असल्याचे असून त्यात दुरुस्ती करण्याचीही सूचना केल्याचे ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकृत फेसबुक पेज आहे. ‘Pimpri Chinchwad municipal Corporation’ या पेजवर महापालिकेच्या घडामोडीची माहिती टाकली जाते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या वॉररुमला शुक्रवारी भेट दिली. कोरोनाची माहिती घेतली. त्याबाबतची माहिती प्रशासनाने फेसबुकवर टाकली आहे. मराठीत माहिती बरोबर आहे. पण, इंग्रजीमध्ये ‘बाथरुम’ला भेट दिल्याचे लिहिले आहे.

महापालिकेचे फेसबुक पेज देश, विदेशातील नागरिक बघत असतात. अजितदादांनी बाथरुमला भेट दिले असे टाकल्याने चेष्ठेचा विषय झाला आहे. त्यामुळे महापालिकेने चूक दुरुस्त करावी आणि संबधितांवर तात्काळ कारवाईची मागणी केली जात आहे.

तात्काळ हकालपट्टी करा, अन्यथा आंदोलन- नाना काटे

महापालिकेचे अधिकृत फेसबुकपेज केवळ महापालिका, शहरातील, राज्यातील नव्हे तर देश-विदेशातील नागरिक पाहतात. यामुळे देश-विदेशातील उपमुख्यमंत्र्यांनी ‘बाथरुम’ची का पाहणी केली, असे म्हणतील.

यामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची बदनामी झाली आहे. उपमुख्यमंत्र्यांची पोस्ट टाकताना दहावेळा चेक करणे आवश्यक होते. सोशल मीडिया सांभाळण्यासाठी महापालिका एक्सपर्टवर हजारो रुपये खर्च करते.

महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर अशी पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तात्काळ निलंबित करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल असा इशारा विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिला आहे.

भाषांतर कसे झाला याचा तपास सुरु
महापालिकेने उपमुख्यमंत्र्यांच्या मेसेज मराठीत टाकला होता. इंग्रजीमध्ये टाकला नव्हता. त्याचे ट्रान्सलेशन कसे झाली आहे, याची तपासणी करत आहेत. त्यात दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.