Nashik : वार्षिक निरंकारी संत समागमसाठी स्वेच्छा सेवांचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचा ५३वा वार्षिक निरंकारी संत समागम नाशिकमध्ये परम पूज्य निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सानिध्यात २४, २५ आणि २६ जानेवारी, २०२० रोजी होणार आहे. नाशिकवासीयांचे हे फार मोठे सौभाग्य आहे, की मागील ५२ वर्षांपासून मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये साजरा होणारा हा कार्यक्रम प्रथमच सुप्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या नाशिक शहरामध्ये आयोजित होत आहे. या संत समागमासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून २५ हजार हुन अधिक भाविक आपली हजेरी लावणार आहेत.

मिशनचा सत्य, प्रेम व एकत्वाचा कल्याणकारी संदेश जनसामान्यांपर्यंत पोचविणे हा या कार्यक्रमाचा उदात्त हेतू आहे. स्मरण असावे, की महाराष्ट्राचा पहिला वार्षिक निरंकारी संत समागम १ जानेवारी, १९६८ रोजी मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर मिशनचे तत्कालीन प्रमुख बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन सानिध्यात संपन्न झाला होता.

समागमाच्या पूर्वतयारीसाठी स्वेच्छा सेवांचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे महासचिव ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस. चिमाजी यांच्या शुभहस्ते रविवार, दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘निरंकारी संत समागम स्थळ’, ठक्कर मैदान, बोरगड, मखमलाबाद, पेठ, धर्मपूर, गुजरात हायवे, नाशिक येथे करण्यात आले. समागमाच्या पूर्वतयारीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातून ५००० हून अधिक सेवादल, स्वयंसेवक नाशिक या ठिकाणी सेवेमध्ये आपला सहभाग दर्शवणार आहेत.

हा उद्घाटन सोहळा एका प्रार्थनेद्वारे प्रारंभ झाला, याप्रसंगी समागम कमिटीचे सदस्य, सेवादल अधिकारी तसेच नाशिक आणि आजूबाजूच्या भागांसह पुणे, पिंपरी-चिंचवड व महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने निरंकारी भाविक भक्तगण उपस्थित होते. याप्रसंगी चिमाजी यांनी निरंकारी भक्तगणांना आवाहन केले, की त्यांनी मोठ्या श्रद्धेने आणि आवडीने समागम सेवांमध्ये आपले योगदान द्यावे, जेणेकरून हा समागम सुंदरप्रकारे संपन्न होईल. ते म्हणाले, की संत निरंकारी मिशन हे प्रेमाचे मिशन असून या संत समागमामध्ये प्रभुप्रेमी भाविकांनी उत्साहाने भाग घ्यावा व अलौकिक प्रेमाचे भागीदार बनावे, अशी जनसामान्यांना विनंती केली. सर्व एकाच परमपित्याची लेकरे असून त्याच्याशी नाते जोडल्यानंतर सर्वांशी प्रेम व आपुलकीचे नाते जोडले जाते असे प्रतिपादन त्यांनी केले.

स्वेच्छा सेवांचे उद्घाटन झाल्यानंतर निरंकारी सेवादलाचे स्वंयसेवक तसेच मोठ्या संख्येने निरंकारी भक्तगण संत समागमाच्या तयारीला लागले. हे सेवादार भक्त नियोजनबद्ध रीतीने त्यांच्यावर जशा प्रकारची सेवा सोपविण्यात आली असेल, तशाप्रकारे आपापल्या सेवा निष्काम भावाने व मोठ्या निष्ठेने निभावू लागले आहेत, ज्यायोगे समाजामध्ये निष्काम सेवाभावनेचे एक उत्तम उदाहरण प्रस्तुत होऊ शकेल.

या सेवांच्या माध्यमातून पुढील काही आठवड्यांमध्ये हे समागम स्थळ तंबू व शामियान्यांच्या एका भव्य नगरीत रूपांतरित होईल, ज्यामध्ये भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था, वीज, पाणी, जलनिःसारण, स्वच्छता गृहे, मोफत लंगर (महाप्रसाद), अत्यल्प दरात चहा व खाद्यपेये देणारी कॅन्टीन इत्यादी यांची व्यवस्था असेल. समागम स्थळावर मुख्य कार्यक्रमाचा भव्य मंडप तयार करण्यात येणार असून त्याच्या आजूबाजूला विविध कार्यालये, प्रकाशन स्टॉल, दवाखाने, निरंकारी प्रदर्शनी यांचे शामियाने बनविले जाणार आहेत.

उल्लेखनीय आहे, की समागमाच्या कार्यक्रमाची संपूर्ण रुपरेषा, योजना, डिजाईनिंग आणि क्रियान्वयन निरंकारी भक्तांद्वारेच केले जाते ज्याला ते आशीर्वाद प्राप्त करण्याची एक सुवर्णसंधी समजून आपले सौभाग्य समजतात. संत समागमामध्ये संपूर्ण महाराष्ट्र तसेच जवळचे गुजरात राज्य आणि देशाच्या अन्य भागांतूनच नव्हे तर विदेशातूनही लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण भाग घेणार आहेत. तीन दिवसीय समागम संपन्न झाल्यानंतर समागम स्थळीच दिनांक २७ जानेवारी, २०२० रोजी जवळपास १०० जोडप्यांचा सामूहिक विवाह समारोह सद्गुरु माताजींच्या पावन सानिध्यात संपन्न होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.