Pimpri: उद्यापासून PMPL सुरु पण लहान मुले, ज्येष्ठांना ‘नो एन्ट्री’

pimpri chinchwad pmpl service will start from tuesday but allowed on certain conditions

एमपीसी न्यूजः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. या लॉकडाउनमुळे तब्बल दोन महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएलची बस सेवा उद्या (मंगळवार) पासून पुन्हा सुरू होणार आहे. परंतु, ही बससेवा सुरु करताना पीएमपीएमएल प्रशासनाने दक्षता घेतली आहे. यासाठी पीएमपीएलने नियमावली बनवली आहे. त्यानुसार 10 वर्षांखालील लहान मुले आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच बसमध्ये क्षमतेच्या 50 टक्के म्हणजेच फक्त 21 प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर केलेल्या लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएल सेवा बंद ठेवण्यात आली होती. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी शहरात काही पीएमपीच्या बस धावत होत्या. मात्र, आता पिंपरी-चिंचवड शहर रेडझोन मधून बाहेर पडले आहे. तसेच शहरातील उद्योगही हळूहळू सुरू होत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पीएमपीएल प्रशासनाबरोबर बैठक घेत बस सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पीएमपीएल प्रशासनाने बस सुरू करण्याबाबतची नियमावली आणि मार्ग निश्चित करून बस सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

मंगळवारपासून (दि.25) पीएमपीची सेवा सुरू होत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहर आणि एमआयडीसी परिसरात पीएमपीची सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे शहर आणि एमआयडीसी परिसरातील 30 मार्गांवर पीएमपीच्या बस धावणार आहेत. पीएमपीच्या निगडी, भोसरी व पिंपरी डेपोतून या बसचे नियोजन करण्यात येणार आहे.

केवळ 21 प्रवाशांनाच परवानगी
”पिंपरी-चिंचवड शहरात अंतर्गत बस मंगळवारपासून धावणार आहेत. औद्योगिक पट्यातही बस जाणार आहे. 80 बस रस्त्यावर असणार आहेत. तर, अत्यावश्यक सेवेसाठीच्या 25 स्वतंत्र बस असणार आहेत. अशा एकूण 105 बस सुरु राहतील. सकाळ आणि संध्याकाळी दोन पाळ्यात बस धावणार आहेत. केवळ 21 प्रवासीच असणार आहेत. एकाआड एक प्रवासी बसतील. वाहक, चालकांना मास्क दिले आहेत. संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे”, असे पीएमपीएलचे व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

हे आहेत बसचे मार्ग
निगडी डेपो (निगडी – नवलखा उंबरे, डांगे- चौक – हिंजवडी माण फेज ३, आकुर्डी रोल्वे स्टेशन – चिखली, निगडी – चऱ्होलीगाव, आळंदी, वडगाव मावळ -चाकण, निगडी – देहूरोड, निगडी – भोसरी, निगडी – कामशेत, निगडी – चाकण, निगडी – हिंजवडी माण फेज 3, चिखली – हिंजवडी माण फेज 3)

भोसरी डेपो (आळंदी – देहूगाव, भोसरी – हिंजवडी माण फेज 3, आळंदी – जांबे, भोसरी – राजगुरूनगर, भोसरी – चाकण, भोसरी – आळंदी, पिंपरी डेपो, भोसरी – म्हाळुंगे एमआयडीसी, पिंपरीगाव – भोसरी, चिंचवडगाव – भोसरी, पिंपरीगाव – चिखली, हिंजवडी माण फेज 3 – आळंदी, चऱ्होलीगाव – रहाटणीमार्गे चऱ्होलीफाटा, भोसरी – रहाटणीगाव, डांगे चौक – जांबे, नेरे दत्तवाडी, चिखली – डांगे चौक, वायसीएम हॉस्पिटल – आळंदी, भोसरी – हिंजवडी माण फेज 3, चिंचवडगाव – चांदखेड)

या दक्षता घ्यावा लागणार!
* बसमध्ये फक्त 21 प्र‌वासीच प्रवास करतील
* प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर असावे, मास्क लावणे बंधणकारक
* 10 वर्षांखालील लहान मुले आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठांना बसमध्ये प्र‌वेश नाही
* मार्गावरील बसची दैनंदिन स्वच्छता व सॅनिटायझींग करणे आवश्यक
* डेपोव्यतिरिक्त बस स्थानकांवर सॅनिटायझिंग टीमची नेमणूक करून बसची स्वच्छता करणे
* कंट्रोलर कम चेकर यांनी बसमध्ये 21 प्रवासी संख्या मर्यादेचे पालन होत असल्याबाबत खात्री करणे
* चालक व वाहक यांनी फेऱ्यांच्या वेळेचे काटेकोर पालन करणे
* बस स्थानकावर गर्दी होणार नाही याची काळजी घेणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.