Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांची गणेशोत्सवाची आचारसंहिता जाहीर

Pimpri Chinchwad Police announces code of conduct for Ganeshotsav.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर केली आहे. कोरोना काळात सामाजिक अंतर राखून तसेच योग्य खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने यंदा गणेशोत्सव साजरा करायचा आहे. त्याबाबतचे पोलिसांनी आवाहन केले आहे. गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशोत्सव तसेच मिरवणुका, वाद्य याबाबत सविस्तर नियमावली देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी जाहीर केलेली आचारसंहिता –

# ही आचारसंहिता गणेशोत्सव काळात (22 ऑगस्ट 2020 पासून 1 सप्टेंबर 2020) लागू राहील.

अ) गणेश मुर्ती खरेदी :

यावर्षी गणेश मुर्तीची खरेदी मंडळांनी/ नागरिकांनी शक्य तो ऑनलाईन पध्दतीने करावी. मनपा कडून क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर गणेश मुर्ती विक्रीकरीता परवानगी दिली जाईल. यावर्षी गणेश मुर्ती विक्री स्टॉलला मनपाकडून रस्ता, पदपथांवर परवानगी दिली जाणार नाही.

ब) श्री. गणेश आगमन

यावर्षीच्या श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. अशा शासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या असुन, तरी मिरवणूकी बाबत शासनाचे सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

श्रींचे आगमन व विसर्जनाच्या विधीसाठी कमीत कमी लोक एकत्र जमतील.

क) श्री गणेश प्रतिष्ठापना

ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंदिरे आहेत त्यांनी श्री गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना मंदीरात करावी. अनन्य साधारण परिस्थितीत मनपाचे नियम व अटींचे पालन करून मंडळास छोटे मंडपा करीता परवानगी दिली जाईल.

गणेशोत्सव-2020 बाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांन्वये गणेश मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता 4 फूट व घरगुती गणपती 2 फूटाच्या मर्यादेत असावी.

ड) श्री गणेश पुजा

श्री च्या आरती व पुजेकरीता जास्तीजास्त 5 व्यक्तीच हजर राहतील. श्री गणेशाचे परंपरागत विधी योग्य ते पावित्र्य राखून करावेत. यावेळी सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्य राहील. गणेश मुर्तीच्या ठिकाणी गर्दी होईल असे उपक्रम टाळावेत.

अनन्यसाधारण परिस्थिती लक्षात घेता गणेश पुजन व इतर आरती ही मंडळाचे कार्यकर्ते किंवा मंदिराचे पुजारी यांनीच करावी. बाहेरील व्यक्तींना त्यात सहभागी करून घेऊ नये. श्रध्देचा विषय असुनही सध्याच्या अनन्यसाधारण परिस्थितीत दर्शन/पूजा याकरीता दृकश्राव्य/डिजिटल माध्यमांचा वापर करावा.

इ) श्री गणेश दर्शन

श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक याव्दारे उपलब्ध करून देण्याबाबत मंडळांने जास्तीजास्त प्रयत्न करावा. ऑनलाईन व्यवस्था करता येत नसल्यास गणेश दर्शनासाठी छोटे छोटे व्हिडीओ बनवून ते संबधितांना पाठवावेत.

चांगल्या व्हिडीओसाठी प्रशासनाकडून बक्षिस देण्याची योजना ठेवण्यात येईल.

गणेश मंडळांनी दर्शनाकरीता ऑनलाईन टोकन, डिजीटल पास सुविधा वेळेची मर्यादा ठेवावी. सामाजिक अंतराचे नियमाचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाही निमंत्रितांना अगर व्हीआयपीना दर्शनाला परवानगी अगर निमंत्रित करण्यात येऊ नये.

परिस्थिती गंभीर व अनन्य साधारण असल्याने ज्याप्रमाणे पंढरपूर वारीचे वेळी लोकांनी घरातूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्याप्रमाणे गणेशाचे घरातूनच दर्शन घ्यावे.

ई) परिसर

# गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळाबाहेर फुलांचे हार/नारळ/ मिठाई/ प्रसाद इत्यादी दुकाने लावण्यास मनाई आहे.

# महत्वाच्या गणेश मंडळांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत व त्यांचे रेकॉडींग करावे.

# गणेश मंडळांनी जाहिरात प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना प्राधान्य द्यावे.

# उत्सव कालावधीत रस्ता/ पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही.

# अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास पूर्णपणे प्रतिबंध आहे

# रुग्णवाहीका, रिक्षा व अत्यावश्यक सेवेतील वाहने सहजपणे जाऊ शकतील एवढी मोकळी जागा ठेवणे आवश्यक.

# ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) व नियम 2000 मधील परिच्छेद 4 च्या तरतुदीप्रमाणे रूग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय, दवाखाने यांचे सभोवताली कमीत कमी 100 मीटरच्या परिसरात ध्वनी क्षेपकाचा वापर करू नये.

उ) सांस्कृतिक व इतर कार्यक्रम

# गणेश मंडळाने या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने उत्सवाचे मांगल्य व पावित्र्य राखले जाईल अशा पध्दतीने करावा.

# संपूर्ण उत्सवाचे काळात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.

# यावर्षी उत्सवाचे स्वरूप उत्सवी नसेल परंतु त्यात पुर्णपणे मांगल्य जपले जाईल, याकरीता मंडळांनी ऑनलाईन उपक्रम राबवावेत. त्याची प्रशासनाकडून योग्य ती नोंद घेण्यात येईल.

# आरोग्य विषयक मदत, विद्यार्थ्यांना, वृध्दांना व गरजुंना मदत तसेच आरोग्य विषयक प्रबोधनपर ऑनलाईन उपक्रम अनेक मंडळे करू इच्छितात. ते स्वागतार्ह आहेच परंतु स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यास योग्य त्या नियमात बसवून घरोघरी मदत पोहोचवून असे उपक्रम करण्याचे प्रयत्न करावेत. कोणीही त्यास समारंभाचे स्वरूप देऊ नये.

उदा. वृध्दांना वस्तु वाटप करण्यासाठी त्यांना जमा करून समारंभ करणेस परवानगी असणार नाही. त्याऐवजी वृध्द गरजूंची यादी बनवून त्याचे सोशल डिस्टसिंग राखून, मास्कचा वापर इत्यादी प्रतिबंधात्मक काळजी घेऊन वाटप करून आवश्यकतेनूसार त्याचे फोटो काढून कार्यक्रम यशस्वी करावा. अनेक मंडळांनी एकमेकाशी समन्वय साधुन असे वाटप एकमेकाच्या मदतीने करणेचा प्रयत्न करावा.

ऊ) सुरक्षा

# सर्व गणेश मंडळाचा व्हाटसअ‍ॅप ग्रुप तयार करुन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सुचना दयाव्यात.

# सार्वजनिक गणेशमंतीची जबाबदारी गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्यावर सोपवावी. मंडळाजवळ हजर स्वयंसेवक कार्यकर्ते यांनी मद्यसेवन करु नये, मद्यसेवन केलेले व्यक्तीला मंडळाच्या मंडपा जवळ येण्यास प्रतिबंध करावा.

# तसेच कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये. कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध केलेली असावी. वाळूच्या बादल्या भरून ठेवाव्यात.

# काही अनोळखी, संशयीत, बेवारस वस्तु उदा. सुटकेस, रेडिओ, मोठे घडयाळ,जेवणाचे डबे, सायकली वगैरे आढळून आल्यास अगर संशयीत व्यक्ती, इसम जवळपास फिरतांना रेंगाळतांना दिसल्यास ताबडतोब पोलीसांना कळवावे. याबाबत संयोजकांनी स्वयंसेवक कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करावे.

# गणेश मुर्तीच्या अंगावर मौल्यवान दागिने असणा-या गणेश मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. मूर्तीच्या संरक्षणासाठी मंडळाचे कमीत कमी 5 कार्यकर्ते अथवा खाजगी सुरक्षा रक्षक 24 तास हजर राहतील याची दक्षता घ्यावी तसेच गर्दी टाळावी.

ए) कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

# कोविड-19 साथ रोगाच्या पार्श्वभुमीवर केंद्र शासन/राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील. कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी, व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी.

# शासनाने कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केलेल्या ठिकाणाच्या गणेशोत्सव मंडळांनी प्रतिबंधीत क्षेत्रास लागू असलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी आरोग्य सेतू अ‍ॅप वापरणे बंधनकारक आहे.

# तसेच गणेशोत्सव कालावधीत गणपती मंडळांनी त्यांच्या मंडळास भेटी दिलेल्या व्यक्तींची नावे, मोबाईल क्रमांक, पत्ता, आरोग्य सेतू अ‍ॅप इत्यादी बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवणे बंधनकारक आहे, जेणेकरून यदाकदाचित संशयीत रुग्ण आढळल्यास कॉन्टेंक्ट ट्रेसिंग करणे सोयीचे होईल.

# कोविड-19 साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने व देखावे न करता साजरा करावा तसेच गणेशोत्सवाच्या वेळी सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे. आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

# श्री गणेशाची आरती करताना आरतीचे ताट व प्रसादाचे ताट अनेक व्यक्तीकडून हाताळले जाणे टाळावे. आरती करण्यापुर्वी व प्रसाद वाटपाच्या पुर्वी ताट सॅनिटायझरने सॅनिटायझ करून घेणे, तसेच हाताळणा-या व्यक्तीने सॅनिटायझरचा वापर करावा. जेणेकरून विषाणूचा संसर्ग टाळणे शक्य होईल.

# मंडळांनी मंडपामध्ये सॅनिटायझेशन करीता सोडियम हायपोक्लोराईड किंवा इतर निरजंतुकीकरण करण्याची साधने ठेवावीत. तसेच छोटा स्प्रे पंपाच्या किंवा सरफेस सॅनिटायझरच्या सहाय्याने वारंवार स्पर्श होणारी ठिकाणे फवारणी करून सॅनिटायझेशन करावे.

मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना विषाणू संसर्गाबाबत सजग राहून उत्सहाच्याभरात कोणाशीही हस्तांदोलन न करता दुरूनच नमस्कार करावा.

ऐ) श्री. गणेश विसर्जन

# या वर्षी पूजेच्या मूर्तीचे विसर्जन मंडपालगतच विधीवत करावे. विसर्जनाकरीता मिरवणूक काढता येणार नाही.

# विसर्जनाकरीता गर्दी होऊ नये म्हणुन नदी पात्रात विसर्जन घाटांचे व हौदांचे व्यवस्था करणार नसल्याबाबत मनपाने घोषणा केली आहे. तरी मंडळांनी त्याची नोंद घ्यावी.

# श्री गणेशाची मुर्ती विसर्जनाकरीता मंडळाने मंडपाचे शेजारी कृत्रिम हौदाची निर्मिती करून त्यामध्ये श्री गणेशाचे मुर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनाच्या वेळी गर्दी न करता कमीतकमी लोक हजर राहतील याची घ्यावी.

# मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमातून होणा-या गर्दीला टाळण्याकरीता सदर बाबीना पुर्णतः मनाई आहे.

# घरगुती गणपती व गौरी विसर्जन नागरिकांनी सोसायटीमध्ये कृत्रिम हौद तयार करून त्यामध्येच करणेबाबत नागरिकांना आवाहन करण्यात यावे. विसर्जनाच्या ठिकाणी पारंपारिक पध्दतीने होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

# लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. विसर्जन करण्यात आलेल्या गणेश मुर्ती व निर्माल्य हे मनपाच्या वाहनामधून घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

# सार्वजनिक घाटांची/ विसर्जन हौदांची सुविधा यावर्षी सेवक व्यस्ततेमुळे मनपाकडून केली जाणार नसल्याने तशी व्यवस्था आपल्या मंदीराजवळ व मंडपाजवळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपआपल्या स्तरावर करावी.

ध्वनी क्षेपकाबाबत – 

ध्वनी प्रदूषण बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटी व शर्थीचे काटेकोर पालन करावे. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार, पाचवा दिवस (दि. 26 ऑगस्ट), सातवा दिवस (दि. 28 ऑगस्ट), दहावा दिवस (दि. 31 ऑगस्ट), अनंत चतुर्दशी (दि. 1 सप्टेंबर) या दिवशी ध्वनी क्षेपकाचा सकाळी सहा ते रात्री 12 पर्यंत वापर करता येईल. इतर दिवशी सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंतच ध्वनी क्षेपकाचा वापर करावा, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलीस मदतीसाठी संपर्क क्रमांक –

नियंत्रण कक्ष, पिंपरी चिंचवड – 27352500, 26209122, 27352600, 27450888

पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड – 27350555

अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड – 27350444

पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पिपरी चिंचवड – 27350120

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 – 27445456

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 – 27445354

वाहतुक नियंत्रण कक्ष, पिंपरी चिंचवड – 27610015 / 16

विशेष शाखा – 27350993

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.